मुंबई -भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल झालेल्या ओबीसी मोर्चा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घरी जाऊन स्वयंपाक करावा, असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, कोणाला काय करायचे आहे हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. मात्र चंद्रकांत पाटील म्हणाले ते अत्यंत चुकीचे वक्तव्य आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही देखील चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरला जाऊन घरी बसावे असे म्हटले तर चालेल का? असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. आज मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
हेही वाचा -चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली; म्हणाले, तुम्ही घरी जा अन् स्वयंपाक करा
शिवसेना नेते तसेच राज्याचेपरिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय तसेच खाजगी निवासस्थानी मिळून एकूण सात जागी ईडीने (Enforcement Directorate ) आज सकाळी धाडसत्र सुरू केले. या मुद्द्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तपास यंत्रणांकडून होणारी कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित नसावी. कोणतेही कारवाई ही पारदर्शक असली पाहिजे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांकडून आपल्याही नातेवाईकांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. कुणाकडूनही आरोप लावल्यास अशा प्रकारच्या कारवाया होत आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय का? असा संशय अनेकांच्या मनामध्ये उपस्थित होत असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा कोणावर कारवाई करणार याबाबत आधीच सांगितले जायचे. त्यामुळे या कारवाईवर कोणाचा हस्तक्षेप नसावा अशी माफक आशा अजित पवार यांनी व्यक्त केली.
इंधन दरवाढ राज्य सरकारने केली नाही -केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी केली मात्र राज्य सरकारने इंधनाच्या दरात कोणतीच कपात केली नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारने इंधनावर कोणताही नवीन टॅक्स लावलेला नाही. केंद्र सरकारने वेगवेगळे टॅक्स इंधनावर लावले आहेत. इंधन दर कपातीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 2400 कोटींचा प्रभाव पडणार आहे. मात्र तरीही अजून इंधन दर कपात केली पाहिजे असे भारतीय जनता पक्षाचे नेते बोलत आहेत, अशी चिंता अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.