मुंबई -'ज्याला अयोध्येला जायचे आहे, त्याला ( Raj Thackeray Ayodhya Visit ) जाऊ द्या. भारतात कोणी कुठेही जाऊ शकतो. त्याचा इतका बोभाटा करायचे आवश्यकता नाही. आम्हीही शिर्डीला गेलो, पण बोभाटा केला नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व मराठी माणसांना एकत्र ठेवण्याचे काम केले. ते कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या रस्त्याने शिवसेना पुढे चालली आहे, असेही ते म्हणाले.
कोणीही सगळं सोडून जात नाही -भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'हरलो तर हिमालयात जाऊ', असे वक्तव्य केले होते. याबाबत बोलताना, निवडणुकीत 'कोणाचा जय तर कोणाचा पराजय होत असतो. त्यामुळे अशा वक्तव्यांना जास्त महत्व देण्याचे कारण नाही. कोणीही सगळं सोडून हिमालयात जाणार नाही, हे आपल्यालाही कळत', अशी खिल्लीही अजित पवार यांनी उडवली.
विकासासाठी आणि शांतीसाठी अयोध्येला -निवडणुकीनंतर पाच वर्षाच्या काळात कामे केली जातात. त्याचे उदघाटन आम्ही नेहमी करत असतो. मुंबईतील पाणी समुद्रात सोडण्याच्या मार्गावर दर्शक गॅलरी उभारण्यात आली आहे. अशाच काही दर्शक गॅलरी आणखी उभारणार आहोत. वाळकेश्वरला वॉकिंग ट्रॅक तयार करत आहोत. अयोध्या हा राजनीती नव्हे तर श्रद्धेचा मुद्दा आहे. यात राजकारण नको. राम मंदिराचा संघर्ष आता संपला आहे. कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यामुळे संघर्षही आता संपला आहे. आम्ही अयोध्याला देशाच्या विकासासाठी आणि शांतीसाठी आयोध्याला जाणार आहोत, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.