मुंबई - मशिदीवरील भोंगे काढण्याची मागणी भाजपकडून जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा यावरून समाचार घेतला. आजकाल विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा केली जाते. जग कोणता विचार करत आहे आणि आपण कोणत्या विषयात जनतेला गुंतवून ठेवतो याचे आत्मपरीक्षण करावे, अशा कानपिचक्याही अजित पवार यांनी (Ajit pawar comment on bjp) यावेळी दिल्या. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.
हेही वाचा -BJP Core Committee Meeting : भाजपकडून राज्यात पोल-खोल अभियान; प्रदेश कोअर कमिटीत निर्णय
मशिदीवरील भोंगे काढावेत, यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. कोणी कोणता मुद्दा घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सरकार कुठलीही असो सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जो निर्णय देईल त्याची अंमलबजावणी सरकारला करावी लागते. मात्र, मुद्दा पटला नाही तर अपील करता येते. जातीय सलोखा राहण्याच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न करायला हवेत. यंदा 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होतील, 75 वर्षे पूर्ण होत असताना जो कुठला विचार करतो आहे आणि आपण कोणत्या विषयात जनतेला गुंतवून ठेवतो आहे, कोणत्या विषयाला जास्त महत्त्व देतो आहे याचे आत्मपरीक्षण, आत्मचिंतन झाले पाहिजे. जनतेनेही या विषयाचा गंभीरपणे विचार करायला हवा, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
अजित पवार यांनी भाजपला खडसावले कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने पूर्णतः निर्बंध उठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत अधिकृत निर्णय आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी आमदारांना घरे बांधून देण्याबाबतही प्रतिक्रिया दिली. कोणालाही मोफत घर देणार नाही, असा निर्णय झाला आहे. प्रसारमाध्यमांनी चुकीची बातमी चालवली, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांबाबत बोलताना, अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा इशारा दिला. कामावर न आल्यास कारवाई करू. मुदत संपल्यावर कठोर कारवाई करणारच, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा -Ajit Pawar Warns ST worker : हजर व्हा! नाहीतर नवीन भरती करू; उपमुख्यमंत्र्यांचा एसटी कामगारांना इशारा