मुंबई - कोरोनाच्या संकटात राज्यात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये टोळधाडीचे आक्रमण झाले आहे. यावर नियंत्रण आणण्याकरिता आता कृषी विभागामार्फत किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. ड्रोनच्याही माध्यमातून या टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याबाबत प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.
मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नाही. मात्र, २४ मे च्या सुमारास मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील अमरावतीच्या काही भागात हे कीटक आल्यामुळे अग्निशमन दलाच्या बंबांच्या माध्यमातून तसेच किटकनाशक फवारणी यंत्राच्या सहाय्याने त्यांच्यावर फवारणी केली. यामुळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त किटकांचा नायनाट झाला आहे, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली. या किटकांवर फवारणी करण्यासाठी लागणारे किटकनाशक प्रादुर्भाव असलेल्या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मोफत पुरविले जात असल्याचेही ते म्हणाले.
गुरूवारी यासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या भागाचा उल्लेख होता, त्याठिकाणी ठाणे विभागाचे कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तेथे टोळधाडीचे आक्रमण झाले नसल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र, गुजरातकडील भागातून या किटकांचे आक्रमण होऊ शकते, ही शक्यता गृहित धरून पालघर आणि गुजरात सीमेलगतच्या भागातील शेतकरी बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, मोर्शी, वरूड या तालुक्यातील काही भागात टोळधाड येऊन गेल्याचे निष्पन्न झाले असून तेथील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. टोळधाडीपासून शेतीपिकाचे नुकसान टाळण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना दिवसा प्रामुख्याने पत्र्याचे डबे वाजवणे, ट्रॅक्टर, मोटर सायकलचे सायलेन्सर काढून मोठा आवाज करून किडीला हुसकावून लावणे, यासारख्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
सायंकाळी ज्या क्षेत्रात किड झाडावर विसावली आहे त्याबाबत कृषी विभागाला माहिती देऊन त्या किडीवर किटकनाशकांची फवारणी करणे, या उपाययोजना केल्या जात आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल, रामटेक या भागात टोळधाडीचा काहीसा प्रादुर्भाव जाणवला असून त्यावर कृषी विभागामार्फत उपाययोजना केल्या आहेत, असे सहसंचालक रवींद्र भोसले यांनी सांगितले.