मुंबई- कोरोनाच्या संकटकाळात मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातील परिचारिका (नर्स) आक्रमक झाल्या आहेत. आता मोठ्या संख्येने नर्सेसनाच कॊरोनाची लागण होत आहे. कारण केईएममधील कॊरोनाबधित नर्सना वेळेत बेड तसेच रुग्णवाहिका मिळत नाही. तसेच त्यांची वेळेत कॊरोना चाचणीही होत नसल्याचा आरोप करत आज या नर्स रत्यावर उतरल्या. थेट अधिष्ठात्यांच्याच कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून मागण्या लावून धरल्या. शेवटी याची दखल अधिष्ठता डॉ. हेमंत देशमुख यांना घ्यावी लागली. मागण्या मान्य झाल्यानंतर तीन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.
कॊरोना संकटात केईएमच्या नर्स आक्रमक केईएम रुग्णालय कोविड रुग्णालय नसतानाही येथे कॊरोना रुग्ण येतात. त्यांना नाईलाजाने दाखल करावे लागते आणि आता येथे 400हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. तर या कॊरोना वॉर्डमध्ये ज्या नर्सेस काम करत आहेत, त्यांना आता कॊरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या घडीला 40हून अधिक नर्स कॊरोना पॉझिटिव्ह आहेत. यातील काही महात्मा गांधी रुग्णालयात, तर काही केईएममध्ये दाखल आहेत.
रुग्णसेवा देणाऱ्या या नर्सेसची वेळेत कॊरोना चाचणी होत नसल्याचा वा त्यांना क्वारंटाइन केले जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे आजार बळावल्यानंतर त्यांना स्वतः धावपळ करावी लागत आहे. त्यातही नर्सलाच बेड आणि रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याचेही चित्र आहे. यासंबंधीचा केईएममधील एका नर्सचा व्हीडिओही नुकताच व्हायरल झाला होता. त्यात आता रुग्णालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन नर्स पॉझिटिव्ह असताना त्यांना एडमिट करून घेतले जात नसल्याने सर्व नर्स आक्रमक झाल्या.
वॉर्डमधून बाहेर पडत त्यांनी रुग्णालय परिसरात ठिय्या मांडला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या व्यथाही मांडल्या. कॊरोना योद्धाचीच हेळसांड होत असल्याने, त्यांनाच उपचार मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी थेट अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख यांच्या कार्यालयाबाहेरच ठिय्या मांडला. पण, शेवटी रुग्णालय प्रशासनाने दोन्ही नर्सला वॉर्ड क्रमांक 10मध्ये दाखल करून घेतले. तर, केईएम रुग्णालयातच नर्सेससाठी आठ दिवसांत कॊरोना वॉर्ड तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने तब्बल तीन तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. केईएममध्ये 15 दिवसांत दुसरे आंदोलन झाल्याने कर्मचाऱ्यांची प्रशासनाबाबतची नाराजी समोर आली आहे.