मुंबई - उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी का स्वीकारावी लागली? याबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र शिवसैनिकाला मुख्यमंत्री न करता, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले असा आरोप भाजपकडून केला जातोय. मात्र प्राप्त परिस्थिती लक्षात घेतात उद्धव ठाकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री काय झाले. याबाबत दोन वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, मात्र भारतीय जनता पक्षाने आपला दिलेला शब्द पाळला नसल्यामुळेच आपल्याला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पुन्हा एकदा सांगितले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमादरम्यान 'आपल्याला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय" असं वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांना उधाण आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेत भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही. तो शब्द जर पाळला गेला असता, तर आज एखाद्या वेळेस आपण राजकीय जीवनातही नसतो, असं मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात स्पष्ट केलं.
हे ही वाचा -महाविकास आघाडीतील महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार?
ठाकरेंनाचं मुख्यमंत्री व्हायचं होतं, हा गैरसमज पसरवला जातोय -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करतेवेळी आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. मात्र त्यांचे हे वक्तव्य खोडून काढण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री व्हायची सुप्त इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडीत सामील होऊन मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. ते इतर कोणत्याही शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री करू शकले असते. मात्र तसं न करता, मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली. कारण त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र प्राप्त परिस्थिती पाहतात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांवर शिवसेनेचे उद्धव ठाकरे वगळता इतर कोणत्याही नेत्यांना एकजूट ठेवता आले नसते. म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली. मात्र आज ज्याप्रमाणे विरोधी पक्ष उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची लालसा असल्याचे सांगत आहेत. यामध्ये तथ्य नसून, केवळ उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला धक्का पोहचावा म्हणून नव्याने मुख्यमंत्रीपदाच्या वादाला खतपाणी घातले जात असल्याचे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले आहे.
हे ही वाचा -शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती
आघाडीत तीनही पक्ष अस्वस्थ -
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही या तीनही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. तीनही पक्षांमध्ये कामांचा कोणताही ताळमेळ दिसत नाही. मात्र या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सातत्याने तिन्हीही पक्षाच्या नेत्यांकडून पुन्हा पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत वक्तव्य केली जात आहेत. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं स्वप्न उद्धव ठाकरे यांनी दाखवलं. मात्र शिवसैनिकाला मुख्यमंत्री न करता ते स्वतः मुख्यमंत्री का झाले ? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.