मुंबई - डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आली आहे. ही लाट आता नियंत्रणात असून पुढील दोन आठवडे लक्ष ठेवले जाणार आहे. रुग्णसंख्या घसरत राहिली तर दोन आठवड्यांनी मुंबई अनलाॅक करण्याची शिफारस टास्क फोर्सला करणार असून टास्क फोर्स राज्य सरकारला याबाबत योग्य ती माहिती देईल. त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Additional Commissioner Suresh Kakani) यांनी दिली.
कोरोना आटोक्यात -
मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटांवर नागरिकांच्या मदतीने पालिकेने नियंत्रण मिळवले आहे. डिसेंबरपासून मुंबईत तिसरी लाट आली. या लाटेदरम्यान ६ ते ८ जानेवारी या तीन दिवसात रोजची रुग्ण संख्या वीस हजारावर गेली होती. त्यानंतर रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आली आहे. गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्या ५०० च्या खाली आली आहे. यामुळे मुंबईतील कोरोना त्यात नियंत्रणात आला आहे.
तर अनलाॅक करण्याची शिफारस -
मुंबईमध्ये २१ डिसेंबरपासून तोरणाची तिसरी लाट सुरू झाली. तिसऱ्या लाटे दरम्यान रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानुसार मुंबईमध्ये रुग्णालय खाजगी रुग्णालय नर्सिंग होम या ठिकाणी ३५ हजाराहून अधिक बेड तयार करण्यात आले. महापालिकेने उभारलेली जम्बो सेंटर ही सज्ज करण्यात आले. यादरम्यान नागरिकांनी दिलेली साथ, नियमांचे केलेले पालन तसेच हर्ड ह्युमॅनिटी झाल्याने कोरोनाची लाट मुंबईत म्हणावी तशी पसरलेली नाही. मुंबईमध्ये सध्या कोरोनाचे तीनशे ते पाचशे रुग्ण आढळून येत आहेत. ही रुग्णसंख्या अशीच घटत राहिल्यास दोन आठवडे रुग्ण संख्येचा आढावा घेत मुंबई अनलाॅक करण्याची शिफारस टास्क फोर्सला करणार असून टास्क फोर्स राज्य सरकारला याबाबत योग्य ती माहिती देईल. त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली.