मुंबई- मुंबईमधील एका महिला डॉक्टरला तीन वेळा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ताजा असतानाच दिल्लीच्या एका ६१ वर्षीय महिला डॉक्टरला कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस दिल्यानंतरही कोरोना झाल्याचा प्रकार जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून समोर आल्याची माहिती मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅबच्या मुख्य असलेल्या डॉ. जयंती शास्त्री यांनी दिली. विशेष म्हणजे लसीचे दोन डोस घेतल्यावर अँटीबॉडीज तयार झाल्यानंतर या डॉक्टरला दोन वेळा कोरोनाची लागण झाल्याचे अभ्यासातून समोर आल्याचे डॉ. शास्त्री यांनी सांगितले.
दिल्लीतील डॉक्टर ३ वेळा कोरोना पॉझिटिव्ह -
दिल्ली येथील एका ६१ वर्षीय महिला डॉक्टरला लहानपणापासून अस्थमा होता. दोन वर्षांपासून हायपरटेन्शन आणि सहा महिन्यापासून डायबेटीस हे आजार आहेत. प्रवास करताना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची असल्याने या डॉक्टरांनी १६ ऑगस्ट २०२० मध्ये कोरोना चाचणी केली. त्यात ही डॉक्टर महिला पॉझिटिव्ह आली. १९ ऑगस्टला या डॉक्टरची चाचणी निगेटिव्ह आली. या डॉक्टरने १ फेब्रुवारी २०२१ ला पाहिला तर १५ मार्च २०२१ ला कोव्हीशील्ड लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर १० एप्रिलला ही डॉक्टर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली. १४ आणि २४ एप्रिलला दोन वेळा ती निगेटिव्ह आली. २५ एप्रिलला ही डॉक्टर तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली. यावेळी ती ५ दिवस हॉस्पिटलमध्ये भरती होती, अशी माहिती शास्त्री यांनी दिली.