मुंबई - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येकवेळी आपल्या कार्यकर्त्यांना 'महाराष्ट्रात जी काही सध्या परिस्थिती आहे त्याकडे एक संधी म्हणून बघा' असे वेळोवेळी आवाहन करत असतात. (Raj visit to Maharashtra) त्या दृष्टीने पक्ष मजबूत करण्यासाठी आता स्वतः राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सात दिवसांचा विदर्भ दौरा केला. त्यानंतर आता राज ठाकरे कोकण दौऱ्याला जाणार आहेत. त्यांचा हा दौरा साधारण ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार असून सहा दिवस ते कोकणात विविध पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहेत.
असा असेल राज ठाकरे यांचा कोकण दौरा -या कोकण दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे तळ कोकणापासून करणार असल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापूर मार्गे राज ठाकरे तळ कोकणात प्रवेश करतील. त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यात प्रत्येकी दोन दिवस वेळ देऊन राज ठाकरे इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची संवाद साधतील. त्यावेळी अनेकांच्या मनसेत प्रवेश देखील होणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या उगमस्थानात मनसे -शिवसेनेचा जन्मच मुळात कोकणातून आणि कोकणी माणसांमुळे झाला आहे. आज देखील शिवसेनेत जितके काही पदाधिकारी खासदार, आमदार, नगरसेवक आहेत त्यातले बहुतांश हे कोकणी आहेत. याच कोकणात शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाल्याने मनसे याकडे एक संधी म्हणून पहात असल्याचे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे शिवसेनेच्या उगम स्थानात मनसेला खरंच पाय रोवता येतील का? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.