मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेत्रदीपक पदार्पण केले. जवळजवळ ३०० पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुका लढवल्या आणि ग्रामीण महाराष्ट्रात एकूण ९६ उमेदवार विजयी ठरले. आपने लातूर, नागपूर, सोलापूर, नाशिक, गोंदिया, चंद्रपूर, पालघर, हिंगोली, अहमदनगर, जालना, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील जागा जिंकल्या असून एकूण विजयापैकी ५०% स्त्रिया उमेदवार विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर पक्षाचा विश्वास वाढला असून येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुकीसाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे.
'नवीन राजकीय संस्कृती'
हा खरोखर स्वच्छ राजकारणाचा विजय आहे आणि एक नवीन राजकीय संस्कृती आपच्या माध्यमातून दिसून आली. आमच्या राजकीय विरोधकांनी साम, दाम, दंड, भेद अशी सर्व विभाजनकारी शस्त्रे वापरूनही आपचे उमेदवार विजयी झाले हे उल्लेखनीय आहे. आमचे नेते अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व आणि आपच्या विकासाच्या नीतीचा हा विजय आहे. राज्य पक्ष संयोजक रंगा राचुरेजी आणि सह-संयोजक किशोर माध्यम यांच्या नेतृत्वात कठोर परिश्रम घेतलेल्या आमच्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. निवडून आलेल्या प्रतिनिधी ग्रामपंचायतींमध्ये चांगले कार्य करू शकेल, अशी परिवर्तनशील भूमिका व विकास या दोन्हीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी सक्षम आहेत, असे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले.
'स्थान आणखी मजबूत करणार'
प्रस्थापित राजकीय पक्षांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणि आम्ही राज्यभरातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करण्याची आशा करतो, असे आपच्या प्रीती मेनन यांनी सांगितले.