मुंबई - औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या काल (17 सप्टेंबर रोजी) झालेल्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांचा भावी सहकारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी उच्चार केला. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राजकीय वर्तुळात उमटलेल्या पाडसादाबाबत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सावध भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. अजून पुढील पंचवीस वर्ष आघाडी सरकारच सत्तेत राहील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले. तसेच वर्षा निवासस्थानी प्रतिष्ठापणा केलेल्या बाप्पाचे दर्शन घ्यायला आपण आलो आहोत. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या खासगी चर्चा प्रसारमाध्यमांना का सांगू? असंही यावेळी राऊत प्रसारमाध्यमांना म्हणाले.