मुंबई -मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा बऱ्याच जणांचा याची लागण झाली होती. आता पुन्हा येथे रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. अशा शहरांमध्ये कोरोनाची दुसरी लाट असल्याचे म्हणता येईल, अशी माहिती फोर्टीस हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअरचे डायरेक्टर आणि महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे. लोकसंख्येची घनता, डायबेटीज-हायपरटेन्शनचे रुग्ण, उन्हाचा चटका आणि लोकांचा बेधडकपणा या कारणांमुळे महाराष्ट्रात कोरोना पेशंट वाढले असून २०२४ पर्यंत कोरोना महाराष्ट्रातून जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना डॉ. राहुल पंडित म्हणाले, की महाराष्ट्रातील शहरांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. शहरांमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. पण ग्रामीण भागांमध्ये पहिलीच लाट संपलेली नाही. तेथे पहिल्या लाटेतील कोरोनाने मान वर काढली आहे. जगभरात कोरोना व्हायरसचे सुमारे तीन हजारपेक्षा जास्त म्युटेशन आढळून आले आहेत. अकोला, अमरावती या पट्ट्यात अचानक रुग्ण वाढले. त्यामागे म्युटंट स्ट्रेन असल्याचे वाटते. यासंदर्भात अजून कोणताही अहवाल आलेला नाही. पण असे म्हणायला हरकत नाही.
लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनावर मात
लसीकरणाची गती वाढवण्याची नितांत गरज आहे. लसीकरणानंतर लोकांच्या शरीरात कोरोनाला प्रतिरोध करण्याची क्षमता निर्माण होईल. या दरम्यान, कोरोना झालेल्या लोकांच्या शरीरात अॅंटिबॉडिज विकसित होतील. यातून हर्ड इम्युनिटी गाठता येईल. हर्ड इम्युनिटीच्या बळावर पोलियो, स्मॉलपॉक्स (देवी) सारख्या रोगांवर मात करता आली. असाच विजय कोरोनावर मिळवता येईल.
यामुळे महाराष्ट्रात वाढला कोरोना
महाराष्ट्र आणि केरळमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. कोरोनाला पळवून लावण्यासाठी सोशल डिस्टंसिंग अत्यंत आवश्यक आहे. डायबिटीज आणि हायपरटेन्शनचे पेशंटही आपल्या राज्यात सर्वाधिक आहेत. त्यांना कोरोना होण्याची शक्यता जास्त असते. भरीस भर म्हणून उन्हाळ्याची सुरवात झाल्याने उन्हाचा प्रकोप दिसून येतोय. गेल्या वर्षीही याच महिन्यांमध्ये कोरोना वाढला होता. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून कोरोनाची पहिली लाट पूर्णपणे गेलेली नव्हती. त्याचे परिणाम दिसून येत आहेत. या प्रमाणाचे काही जिल्ह्यांमध्ये व्हायरसमध्ये म्युटेशन झाल्याचे दिसून येते. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येते.
लसीकरणानंतरही कोरोना होणे शक्य