मुंबई -न्यायालयाचे संरक्षण ( supreme court protection to Parambir Singh) मिळाल्यानंतर 48 तासांत परमबीर सिंग हजर होईल, ते भारतातच आहे, असा दावा त्यांच्या वकिलाने केला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 48 तासांची मुदत उद्या संपणार आहे. त्यामुळे, आता परमबीर सिंग (Parambir Singh) हे उद्या कुठे हजर होतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी काँग्रेसचाही उमेदवार रिंगणात, तिरंगी निवडणूक होणार
मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने परमबीर सिंग यांना फरार आरोपी म्हणून घोषित केले आहे. मुंबई मरीन लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत खंडणीच्या प्रकरणात परमबीर सिंग यांना न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. जर 30 दिवसांच्या आत न्यायालयासमोर हजर झाले नाही तर, त्यांची मालमत्ता देखील सील करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार परमबीर सिंग यांच्या मालमत्तांवर न्यायालयाच्या नोटीस देखील चिपकवणे सुरू झाले आहे.
परमबीर सिंह यांच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल
परमबीर सिंह यांच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ठाणे, मुंबईमध्ये खंडणी, धमकी यांसारखे अनेक गुन्हे परमबीर सिंग यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांवर लावण्यात आलेले आहे. परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कुठे उपस्थित होतात? हे पाहावे लागणार आहे. ते मुंबईत चांदिवाल आयोगासमोर हजर होतात की, सर्वोच्च न्यायालयासमोर, पहावे लागणार आहे.
नेमके प्रकरण काय?
परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली होती. परमबीर सिंग हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. तर, दुसरीकडे श्यामसुंदर अग्रवाल यांनी सिंग यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोप करत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या आरोपांप्रकरणी आतापर्यंत 4 पोलीस अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस परमबीर सिंग यांचा शोध घेत आहेत. ते चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे, सिंग यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, त्या आधीच न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. त्यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित करण्यात आले. तसेच, या प्रकरणी पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे.
परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण
फौजदारी गुन्हे दाखल असल्याने अटकेच्या भीतीने गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अटकेपासून संरक्षण दिले. तसेच, त्यांच्या याचिकेवर बाजू मांडण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकार, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांना दिले. परमबीर सिंग देशातच आहेत, ते फरार होऊ इच्छित नाहीत, आणि कुठे पळूनही जाऊ इच्छित नाहीत. परंतु, त्यांच्या जिवाला सध्या धोका आहे, असे त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
हेही वाचा -मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता निधी तुपाशी; जनता मात्र उपाशी, लोकायुक्त चौकशीची भाजपची मागणी