मुंबई -महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री यांच्यावर थेट भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले. यामध्ये आरोप झालेल्या नेत्यांपैकी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना खासदार भावना गवळी, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. मात्र कालपासून (7 ऑक्टोबर) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक, सख्ख्या तीन बहिणी आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या संस्था आणि कार्यालयाची झाडाझडती प्राप्तीकर विभागाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या रडारवर उपमुख्यमंत्री अजित पवार आले आहेत का? असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय.
शिवसेनेनंतर अजित पवार भाजपाच्या रडारवर?
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून याआधी शिवसेना पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जात होते. मात्र आता अजित पवार यांच्या नातेवाईकांवर सुरू असलेले धाडसत्र पाहता, भाजपाच्या रडारवर अजित पवार आले आहेत असे चित्र निर्माण झाले असल्याचे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले. केंद्रीय तपास यंत्रणा या स्वतंत्र असल्या तरी, त्यांच्या कामांवर केंद्र सरकारचा बडगा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या नातेवाईकांवर सुरू असलेली प्राप्तीकर विभागाची कारवाई त्याचाच भाग आहे का? असं म्हटलं जाऊ शकतं. या आधीही अनेक वेळा नेत्यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी आरोप केले जाण्याचा इतिहास जुना नाही. अशा आरोपांमुळे संबंधित नेत्यांविरोधात राजकीय वातावरण तयार होत असते. त्याचा थेट फटका त्यांच्या राजकीय जीवनात बसत असतो. तसेच केलेले आरोप सिद्ध होणे, किंवा न होणे ही खूप मोठी कायदेशीर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकरण शांत झालेल असतं. मात्र आरोप केल्यामुळे राजकीय जीवनात फटका त्या नेत्यांना बसत असतो. त्यामुळे आता आरोप करण्यात आलेल्या आघाडी सरकारच्या नेत्यांना तो फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही अजय वैद्य यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा -मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेने वेडी ठरवले, पवारांचे टीकास्त्र
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी करण्यासाठी आम्ही तयार -
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटच्या नातेवाईकांवर कालपासून आयकर विभागाकडून धाडी टाकल्या जात आहेत. केवळ राजकीय सूडापोटी आणि राजकीय हेतू ठेवून भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अशा प्रकारच्या कारवाया करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा सरकार नाही, अशा राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून तेथील सरकारला बदनाम करण्याचा अजेंडा भाजपचा आहे. मात्र येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बुडवलेल्या बँकेच्या चौकशा सुरू होतील असा इशाराही मलिक यांनी दिला आहे. तसेच राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं चित्र निर्माण होणार असेल तर त्यासाठी देखील आम्ही तयार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा -चिपी विमानतळाचे श्रेय भाजपचेच.. मुख्यमंत्र्यांनी पाहुणे म्हणून यावे अन् उद्घाटन करावे - नारायण राणे
जरंडेश्वर कारखान्याचे खरे मालक कोण?
अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या संस्थांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी अजित पवार यांना आव्हान देत जरंडेश्वर कारखान्याचे खरे मालक कोण? हे सांगावे असा आव्हान केल आहे. या कारखान्याच्या खरेदी-विक्री अजित पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप पुन्हा एकदा सोमैय्या यांच्याकडून करण्यात आले आहे.