मुंबई -अनिल परबयांची ईडीकडून चौकशी झाल्यानंतर महाविकास आघाडीचा कोणता नेता आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे, याचे तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात लावली जात आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे नातेवाईक यांच्यासहीत त्यांच्या निकटवर्ती हे केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. तसेच अनिल परब यांच्यानंतर महाविकासआघाडीच्या इतर नेत्यांनाही केंद्रीय तपास यंत्रणेनेकडून चौकशीच्या फेर्याला समोर जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्या नेत्यांवर असणार केंद्रीय तपास यंत्रणेची करडी नजर, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार सातत्याने महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची यादी बरीच मोठी आहे. तरी 26 मे रोजी ईडी अधिकाऱ्यांच्या रडारवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब होते. अनिल परब यांच्या शासकीय आणि खाजगी निवास्थान सहित त्यांच्या निकटवर्तीयांनी मिळून एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडी टाकल्या. अनिल परब यांच्यावर झालेली कारवाई ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना संदेश देणारी होती, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
सोमैयांनी आरोप केलेल्यावर कारवाई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनीमध्ये अनिल परब हे सर्वात आधी येतात. त्यांच्यावर झालेली कारवाई मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला धक्का पोहोचवणारी आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय हे अनिल परब हेच घेत असतात. किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील महानगरपालिकेच्या बाबतीत निर्णय घेताना अनिल परब यांच्याशी चर्चा मसल्लत केल्यानंतर तो निर्णय घेतात. त्यामुळे होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी अनिल परब यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यास त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. अनिल परब यांची 13 तास चौकशी आणि धाडसत्र झाल्यानंतर परब यांनी थेट मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी घातले. 13 तासात घडलेल्या प्रत्येक घटनेबाबत अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. त्यातूनच येणाऱ्या काळात शिवसेना किंवा महाविकास आघाडी वर यासारखी कारवाई पुन्हा एकदा होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. त्यांच्यावर झालेली कारवाई ही केंद्र सरकारने सूडा पोटी केल्याचा आरोप सातत्याने महाविकासआघाडी सरकारकडून केला जात असला तरी, महाविकासआघाडी सरकार हे पूर्णता भ्रष्टाचारी सरकार असून यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया त्यांच्या नेत्यांवर होतील. असा थेट आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येतो. खास करून भाजपचे नेते किरीट सोमैया यांच्याकडून सातत्याने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच त्यांचे नातेवाईक आणि इतर नेत्यांना थेट आरोप केले जातात. तसेच किरीट सोमैया यांच्याकडून ज्या मंत्र्यांवर आरोप केले आहेत, त्यांची चौकशी देखील केंद्रीय तपास यंत्रणांकडून केली जात आहे.
यशवंत जाधव - मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर देखील केंद्रीय तपास यंत्रणेची नजर आहे. यशवंत जाधव यांनी बोगस असेल कंपन्या तयार करून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तसेच यशवंत जाधव हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्ती यांपैकी एक आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसाठी मोठी जबाबदारी यशवंत जाधव यांच्यावर असते. आयकर विभागाने तर FEMA कायदाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस दिली होती. त्यामुळे यशवंत जाधव यांच्यावर ही कधीही कारवाई होण्याची शक्यता आहे.