मुंबई- सिनेप्रेमी आणि नाटक प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. राज्यात उद्यापासून सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू होणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरनुसार २२ ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृहे खुली होणार आहेत. तयारी सुरू झाली आहे आणि कलाकारदेखील कामाला लागले आहेत. व्यवसायिक नाटक निर्माते सरकारच्या पन्नास टक्के उपस्थिती या निर्णयावर नाराज आहेत. मात्र दुसरीकडे प्रायोगिक आणि स्पर्धा करणारे युवा कलाकार आनंदात आहेत. भांडुप येथील भांडुप कलाकार कट्टा या ग्रुपने देखील तालमीला सुरुवात केली आहे व अखेर नाट्यगृह सुरू होत असल्याने त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
रंगीत तालीमला सुरुवात
राज्यात अखेर 22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहांमध्ये तिसरी घंटा वाजणार आहे आणि यासाठी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना खुर्च्यांवर खिळवून ठेवण्यासाठी कलाकारांनीदेखील आपल्या अभिनयाचा कस लावायला सुरुवात केली आहे. यासाठी कलाकारांनी त्यांच्या रंगीत तालीमींनादेखील सुरुवात केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळामुळे नाट्यगृहाचे पडदे उघडले गेले नव्हते.
अखेर मागणी पूर्ण झाली
अनेक व्यावसायिक रंगभूमीवरील कलाकारांवर आर्थिक विवंचना होतीच. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मकडे प्रेक्षकांचा कल वाढलेला पाहायला मिळाला, त्यामुळे अखेर लवकरात लवकर रंगभूमीचे पडदे उघडले जावेत, अशी मागणी कलाकारांकडून होऊ लागली होती. अखेर राज्य सरकारने काही नियमावली जारी करत 22 ऑक्टोंबर पासून सिनेमागृह आणि रंगभूमीसाठी परवानग्या दिल्या. त्यामुळे अखेर कलाकारांनी आपली मरगळ झटकत नाटकांच्या रिहर्सलला सुरुवात केली आहे.