मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांची वसुली प्रकरणाचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप बद्दल या प्रकरणामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला तर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना देखील पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता राज्य सरकारकडून न्या.कैलाश चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगासमोर काल परमवीर सिंग यांनी वकीला द्वारे शपथपत्र सादर केले आहे.
मी माझी तक्रार मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेली आहे. आता त्या संदर्भात मला कुठलेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत वा उलटतपासणीही करायची नाही असे शपथपत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी न्या.कैलाश चांदीवाल आयोगासमोर मुखत्यारमार्फत पॉवर ऑफ ॲटर्नी दिले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले होते असा आरोप करणारे पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २० मार्च २०२१ रोजी दिले होते. त्या पत्राची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चांदीवाल आयोग स्थापन केला. या आयोगासमोर सिंग यांनी पॉवर ऑफ ॲटर्नी दिलेले महेश पांचाल यांनी शुक्रवारी शपथपत्र सादर केले. परमबीर यांच्या वतीने या शपथपत्रात अशी भूमिका मांडण्यात आली आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिलेली होती तसेच सर्वोच्च न्यायालयासही त्याबाबत अवगत केलेले आहे. तब्येतीच्या कारणामुळे स्वत: आयोगासमोर हजर राहू शकत नाही असेही स्पष्ट करण्यात आले. आता त्या पत्रासंदर्भात त्यांना कोणतेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत तपासणी वा उलटतपासणीही करायची नाही. चांदीवाल आयोगाने यापूर्वी परमबीर सिंग यांना हजर राहण्यासंदर्भात दोन वेळा जामीनपात्र वॉरन्ट काढला होता.
आपले अशीलही आयोगासमोर आलेले नाहीत
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार तर दिली पण ते स्वत: आयोगासमोर साक्षीसाठी तर येतच नाहीत शिवाय आता त्यांना साक्षी-पुरावे द्यायचेच नसल्याची भूमिका घेत आहेत याकडे देशमुख यांच्या वकिलांनी न्या.कैलाश चांदीवाल यांचे लक्ष वेधले. त्यावर आपलेही अशील अनिल देशमुख आजवर आयोगासमोर आलेले नाहीत याचे भान ठेवून बोला अशी समज न्या.चांदीवाल यांनी देशमुख यांच्या वकिलास दिली.