महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे स्टेअरिंग सदावर्तेंच्या हाती, भाजपसह आघाडी सरकारवर टीका

एसटी कर्मचारी आंदोलनाचे नेतृत्व ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांनी हाती घेत, भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे. तसेच गोपीचंद पडळकर (BJP Mla Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (BJP Mla Sadabhau Khot) यांना आंदोलनातून आझाद केल्याची घोषणा त्यांनी केली. भाजपने हे आंदोलन स्थगित केले असल्याची घोषणा आज केली होती.

Adv Gunaratna Sadavarte
वकील गुणरत्न सदावर्ते

By

Published : Nov 25, 2021, 3:36 PM IST

Updated : Nov 25, 2021, 5:28 PM IST

मुंबई -राज्य शासनाच्या अंतरिम वेतनवाढीच्या प्रस्तावानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers Strike) पुकारलेल्या संपातून भाजप नेत्यांनी (BJP Leaders) माघार घेतली. मात्र, विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे नेतृत्व ॲड.गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांनी हाती घेत, भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. तसेच गोपीचंद पडळकर (BJP Mla Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (BJP Mla Sadabhau Khot) यांना आंदोलनातून आझाद केल्याची घोषणा त्यांनी केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. डंके की चोट पे विलीनीकरण करवून घेणारच, असा इशारा यावेळी राज्य सरकारला देण्यात आला.

प्रतिक्रिया देताना वकील गुणरत्न सदावर्ते
  • कष्टकऱ्यांना तोडण्यासाठी भांडण -

वेतनवाढीसह विलीनीकरणाच्या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेला संप मोडीत निघावा, यासाठी राज्य शासनाने किमान सात हजार रुपयांची घसघशीत वाढ दिली. कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू व्हावे, असे आवाहन केले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी आंदोलनातून माघार घेतल्याचे स्पष्ट केले. मात्र, काहीच वेळात आंदोलनाचे नेतृत्व वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हाती घेत, पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना लक्ष्य केले. खोत आणि पडळकरांनी पोलिसांच्या गराड्यात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा तुम्ही काय ते समजून जा, सरकारने त्यांना आपल्यात घेतले आहे. पडळकर आणि खोत यांच्या आंदोलनाच्या स्थगितीला कर्मचारी लाथाडत असल्याचा इशारा सदावर्ते यांनी दिला. तसेच आजपासून आंदोलनातून खोत आणि पडळकरांना आम्ही आझाद केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शरद पवार यांनी कष्टकऱ्यांना तोडण्यासाठी, भांडण लावून तोडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला. डंके के चोट पे, एक मराठा, लाख मराठा, विलीनीकरण झालेच पाहिजे आदी जोरदार घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान दणाणून सोडले.

  • 26 नोव्हेंबरला संविधान परिषद -

एसटी कर्मचाऱ्यांनी एक लोक चळवळ उभारली आहे. कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर 70 वर्षांनी हा अभूतपूर्व लढा सुरु आहे. सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी स्वतःसाठी या आंदोलनाला स्थगिती दिली. आम्ही विलीनीकरणासाठी डंके की चोट पे, हे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा सदावर्ते यांनी दिला. मागण्यांसाठी 40 कर्मचाऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे राज्यभरात कर्मचारी दुखवटा पाळत आहेत. तसेच राज्य शासनाच्या निषेधार्थ 26 नोव्हेंबरला 250 एसटी डेपोमध्ये कुटुंब कबिल्यासह संविधान परिषद दिवस पाळावा, असे आवाहन सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना केले.

  • शिष्टमंडळाला निर्णय अमान्य-

कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहात काल अंतरिम वेतन वाढीच्या मुद्द्यावर पाच तास चर्चा झाली. भाजप नेते सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, 9 जणांचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते. वेतनवाढीच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. भाजपने कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर संपाबाबत भूमिका स्पष्ट करु, असे स्पष्ट केले होते. गुरुवारी सकाळी भाजपने संपातून माघार घेतली. कर्मचारी संतप्त झाले असून हा संप राजकीय नव्हता तर कामगारांचा होता. आम्हाला वेतनवाढीचा निर्णय अमान्य आहे. विलीनीकरणावर आम्ही ठाम आहोत, असे स्पष्ट केले. परंतु, शिष्टमंडळ सह्याद्रीतून बाहेर येऊन सत्य सांगतील म्हणून त्यांना पोलिसांच्या बंदोबस्तात ठेवल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना तत्काळ बडतर्फ करा, अन्यथा आम्ही राज्यपालांकडे तक्रार करू, असेही सदावर्ते म्हणाले.

  • थातूरमातूर उत्तरे -

एक मराठा ही जातीय घोषणा नाही. या घोषणेमुळे ऊर्जा मिळते. संपाचे प्रतिनिधित्व कामगारांनी केले, कोणी राजकीय पुढाऱ्यांनी नाही. माझ्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडवू शकत नाही. मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाही, असेही सदावर्त म्हणाले. एकीकडे न्यायालयाचा दाखला देताना, दुसरीकडे विलीनीकरणाच्या मागणीसाठी समिती नेमली आहे. न्यायालयाचा हा अवमान नाही का, असा प्रश्न विचारला असता, सदावर्ते यांनी थातूरमातूर उत्तरे देत, प्रश्नाने उत्तर देणे टाळले.

  • इन्स्टिट्यूशनल मर्डर -

आजपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या इन्स्टिट्यूशनल मर्डर आहेत. आमचे मित्र संजय राऊत लेखनी चालवतात. त्यांनी एकदा तरी आपल्या रोखठोकमधून या संपाच्या बाजूने लिहावे, असे आवाहन सदावर्ते यांनी केले. राऊत यांनी आंदोलकांच्या बाजूने भूमिका घेऊ नये, हे लज्जास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली.

Last Updated : Nov 25, 2021, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details