मुंबई - सर्वोच्च न्यायालयात स्थगिती दिलेल्या मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी या वादात उडी घेतली आहे.
...म्हणून मी मराठा आरक्षणाची बाजू मांडली नाही, महाधिवक्त्यांचा खुलासा - maratha reservation news
मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
'मी कोर्टात बाजू मांडू नये, यासाठी मराठा समाजाने तत्कालीन (फडणवीस) सरकारकडे मागणी केली होती',असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागणीला मान देऊन मी मराठा आरक्षणाच्या सुनावणीपासून दूर राहिलो, असा गौप्यस्फोट कुंभकोणी यांनी केला आहे. मराठा समाजाला अजूनही असेच वाटत असेल, तर मी यापासून संपूर्णपणे अलिप्त राहीन, असेही कुभकोणी यांनी स्पष्ट केले.
“कोणत्याही वकिलावर अविश्वास दाखवू नका. मराठा आरक्षणाची अंतिम लढाई अजून बाकी आहे. आमच्यावर होणारे आरोप पूर्ण चुकीचे आहेत. यापुढच्या कायदेशीर बाबींवरून लक्ष हटवू नका, आरक्षणाचा संपूर्ण फायदा संबंधितांना मिळाला पाहिजे. वकिलांवर आरोप करून काहीही साध्य होणार नाही, असे आरोप केल्यास याचे विपरीत परिणाम होतील”, असे आशुतोष कुंभकोणी यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोपांची राळ सुरू असताना महाधिवक्त्यांचे हे मत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
“मी कोर्टात बाजू मांडू नये, अशी मागणी मराठा समाजाने केली होती. मात्र तरीही याबाबत मी शक्य ती सगळी मेहनत घेतली. त्यानंतर सरकारने तुम्ही बाजू मांडू नका, अशी विनंती मला केली. त्यामुळे मी कोर्टात प्रत्यक्ष बाजू मांडली नाही. समाजाचा आणि तत्कालीन सरकारचा मान राखला”, असे आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले.
“हायकोर्टात मराठा आरक्षण टिकले, याला सर्वांची मेहनत कारणीभूत आहे. मी माझ्या बाजूने सर्व प्रयत्न केले आहेत. मी कुठेही यात लक्ष द्यायला कमी पडलो नाही. मराठा समाजाला अजूनही असं वाटत असेल, तर या प्रकरणापासून मी सर्वार्थाने बाजूला व्हायला तयार आहे.” असे कुंभकोणी यांनी म्हटले आहे.
“न्यायालयाची अंतिम लढाई अजून बाकी आहे. त्यामुळे कोणत्याही वकिलावर वैयक्तिक टीका करू नका. मूळ मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे. त्यावरून लक्ष विचलित करू नका,” असे आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले.