मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात ( Silver Oak Attack ) आरोपी म्हणून अटकेत असलेल्या ऍड. गुणरत्न सदावर्ते ( Adv. Gunaratna Sadavarte ) यांची 18 दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली. या 18 दिवसांत त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं ?, पोलिसांची वागणूक त्यांच्यासोबत कशी होती ?, तुरुंगातील त्यांचा अनुभव कसा होता ? या सर्व मुद्द्यांवर सदावर्ते यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलत होते.
कैद्यांना शिकवला योगा -यावेळी सदावर्ते म्हणाले की, "मला तुरुंगात टाकण्यात आले. हा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णकाळ होता. जेलमध्ये मी एका पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले. तिथे एका पोलीस कर्मचाऱ्याला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मला थोडीफार माहिती असल्याने मी त्या कर्मचाऱ्यांच्या तोंडातली लाळ काढली, त्यांना ऑक्सिजन दिला आणि त्यांचा प्राण वाचला. या दिवसात मी तेथील कैद्यांसोबतही मिसळलो. मी एक योगा शिक्षक असल्याने कैद्यांना योगाही ( Yoga ) शिकवला, मेडिटेशन शिकवले ( Meditation )", असे सदावर्ते यांनी सांगितले.
मी तुरुंगातून होतो कर्मचाऱ्यांच्या संपर्कात -पुढे सदावर्ते म्हणाले, "इतकेच नाही तर या माझ्या सुवर्णकाळात मी आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्याही ( MSRTC Workers ) संपर्कात होतो. मी त्यांना सतत सूचना करत होतो. त्यांनी कधी कामावर रुजू व्हावे, कधी कुठले पाऊल टाकावे, अशा इतंबूत सूचना मी आमच्या कर्मचाऱ्यांना कारागृहातून देत होतो. सतत त्यांच्या संपर्कात होतो."