मुंबई -राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेने वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांनाही याआधी पाठिंबा दिला होता, असेही आदित्य ठाकरे ( Shiv Sena leader Aditya Thackeray ) म्हणाले. विधानभवनात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. राष्ट्रपती पदासाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. विधानभवनात सर्व पक्षीय आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह १५ आमदारांनी दुपारच्या सत्रात मतदान केले. दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही राष्ट्रपती पदासाठी उभ्या असणाऱ्या एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांना मतदान केले आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
कोणत्याही राजकीय पक्षासोबत आमचे राजकीय मतभेद असतील तरी एक महिला उमेदवार म्हणून मुर्मू या निवडणुकीसाठी पुढे आल्या आहेत. आम्ही त्यांना जाहीरपणे समर्थन दिले असून मतदान केल्याची कबुली आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच राष्ट्रपती हे सर्व राजकीय पक्षांपेक्षा मोठे पद असते. त्यामुळे योग्य व्यक्ती म्हणून पाठिंबा दिलेला असतो, असे ठाकरे म्हणाले. आदिवासी समाज आजही सोयी सुविधांपासून वंचित आहे. खेडोपाड्यात समाजाच्या अनेक समस्या आहेत. मुंबई नजीक असलेल्या मोखाडा, पालघर सारख्या आदिवासी भागात फिरत असताना, त्या शिवसेनेकडून सोडवण्यासाठी प्रयत्न केले. आता आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून जेव्हा मुर्मू या विजयी होतील, तेव्हा या राज्यातील आदिवासी पाड्यांचा विकास होईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.