मुंबई- पर्यटकांनी वारसा स्थळांना भेट द्यावी आणि त्यांना त्या स्थळांची सविस्तर माहिती मिळावी यासाठी वारसा स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे असल्याचे मत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. राज्याला आणि देशाला याचा निश्चितच लाभ होईल. पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय पुरातत्व संस्थेच्या समन्वयाने यासाठी योजना तयार करावी, अशी सूचना पर्यटन मंत्री ठाकरे यांनी यावेळी केली.
पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद सर्कल मधील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज मुंबईत बैठक बोलवण्यात आली होती. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे डॉ मिलन चौले, डॉ. राजेंद्र यादव आदी यावेळी उपस्थित होते.