मुंबई - मुंबईमध्ये पाणी चोरी आणि दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत. तसेच ओसी नसलेल्या इमारतींना पाणी जास्त दराने मिळते. पाणी हा नागरिकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. येत्या १ मे पासून मुंबईमध्ये मागेल त्याला पाणी दिले ( water for everybody in Mumbai ) जाईल. या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाईल, अशी माहिती राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
नागरिकांना थेट नळाद्वारे स्वच्छ पाणी -मुंबई महानगरपालिकेच्यावतीने नवीन पाण्याचे धोरण ( BMC water policy ) बनवले जात आहे. याचा आढावा आज पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Aditya Thackeray on water supply ) घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, की आजच पालिका शाळांमधील मूलांना आर्थिक ज्ञान मिळावे म्हणून मुंबई स्टॉक एक्स्चेंज आणि मुंबई महापालिका ( Mou of BMC and BSE ) यांच्यात सामजंस्य करण्यात आला आहे. त्यानंतर आपल्या देशातील नागरिकांना काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यात स्वच्छ पाणी मिळण्याचा नागरिकांचा अधिकार आहे. हे स्वच्छ पाणी पालिकेकडून थेट नागरिकांना नळाद्वारे मिळावे, म्हणून मागेल त्याला पाणी देण्याची योजना राबवली जाणार आहे.
पाणी चोरी रोखता येणार -मुंबईमध्ये पालिकेचे पाणी मिळत नाही, म्हणून पाणी चोरी केले जाते. काही पाणी माफिया दुप्पट किमतीत नागरिकांना पाणी विकतात. तसेच काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा केला जातो. घराघरात नळाद्वारे पाणी दिल्याने पाणी चोरी रोखता येणार आहे. तसेच नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल. पाण्याच्या नावाने निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात राजकारण होते. हे राजकारणही बंद होईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ओसी नसलेल्या इमारतीमधील नागरिकांना जास्त किंम्मत देऊन पाणी घ्यावे लागते. सर्वांना पाणी दिल्याने ओसी नसलेल्या इमारतीमधील नागरिकांनाही सर्वसामान्य दरात पाणी मिळेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजपला टोला, मुंबईकर एकत्रच राहणार -मुंबईमध्ये नालेसफाईबाबत भाजपकडून आरोप केले जात आहेत. नालेसफाईच्या कामांची भाजप पाहणी करत आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, की ते इतके वर्षे आमच्यासोबत होते. त्यांना फिरू द्या. त्यांना नालेसफाईची कामे झाल्याचे दिसेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला. मुंबईच्या मानखुर्द परिसरात दोन धर्मीयांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावर बोलताना मुंबईत तणाव होणार नाही. स्टंटबाजी चालणार नाही. मुंबईकर एकत्र राहतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.