मुंबई- मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. पाणी साचल्यावर मुंबई ठप्प होते. ज्या ठिकाणी पाणी साचते अशा परिसरात कामे सुरू केली आहेत. ही काम अंतिम टप्प्यात आहेत. यामुळे पाणी तुंबणार नाही असे सांगू शकत नाही मात्र पाणी कमी प्रमाणात भरेल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. यामुळे यंदाही पावसाळ्यात काही प्रमाणात का होईना पाणी तुंबण्याच्या प्रकाराला मुंबईकरांना समोर जावे लागणार आहे.
'पाणी कमी प्रमाणात भरेल'
मुंबईमध्ये मेट्रोची ट्रायल रन सुरू आहे. या दरम्यान कोणताही अपघात होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी व अपघात झाल्यास कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबतचे प्रशिक्षण मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मेट्रो कर्मचाऱ्यांना देण्यात आले. यानंतर काकाणी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना मुंबईमध्ये ११ जूनला पाऊस येईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यासाठी पालिका सज्ज झाली आहे. पावसात पडणारी झाडे हटवण्याची कामे पालिका करते. सोसायटीच्या आवारात असलेली धोकदायक झाडे हटवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे त्याठिकाणी वाढवले जाईल. नालेसफाई पावसाअगोदर केली जाईल. ज्या ठिकाणी पाणी साचते तिथे पंप लावले आहेत. भुयारी टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. भुयारी टाक्यांमध्ये पाणी साचवले जाईल. समुद्राची भरती गेली की पाणी समुद्रात सोडले जाईल. हिंदमाता येथे जे काम आहे ते अंतिम टप्यात आहे. पाणी तुंबणार नाही असे सांगू शकत नाही पण कमी प्रमाणात भरेल याची शक्यता नाकारता येत नाही असे काकाणी म्हणाले.
मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
मुंबईत मेट्रोची ट्रायल रन डीएननगर ते दहिसर या ठिकाणी केली जात आहे. यादृष्टीने आपत्तीच्या वेळी कोणती खबरदारी घेण्यात यावी यासाठी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मेट्रोची टेस्ट करताना कोणती घटना घडू नये यासाठी दोन दिवसात 40 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. आपत्तीजनक घटना घडत असेल तर त्यावेळेस कोणती खबरदारी घेण्यात यावी यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
म्यूकरमायकोसिचे 350 सक्रिय रुग्ण
म्यूकरमायकोसिसचे सध्या ३५० सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ७० टक्के रुग्ण मुंबई बाहेरचे आहेत. म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढ कमी होत आहे. रुग्णाला रुग्णालयात दाखल करून योग्य ते उपचार केले जात आहे. असे काकाणी यांनी सांगितले.