मुंबई - चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत पुनर्वसन प्रकल्प ( Siddharth Colony Electric Line Cuting ) राबवला जात आहे. २००५ पासून हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. येथील रहिवासी आणि विकासकाने अद्याप अदानी ईलेक्ट्रीसिटी ( Adani Electricity) या कंपनीची १०२ कोटींची वीज थकबाकी भरलेली नाही. यामुळे अदानी वीज कंपनीने सिद्धार्थ कॉलनीमधील ३५०० ग्राहकांची वीज कापली आहे.
काय आहे नेमके प्रकरण -मुंबई उपनगरात रिलायन्स इन्फ्राकडून वीज पुरवठा केला जातो. रिलायन्स इन्फ्राकडून अदानी ईलेक्ट्रीसिटीने कंपनी विकत घेतली आहे. अदानीकडून वीज पुरवठा केल्या जाणाऱ्या चेंबूर विभागात सिद्धार्थ नगर हा विभाग आहे. या विभागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीच्या जागी पुनर्वसन प्रकल्प राबवला जात आहे. २००५ पासून येथील रहिवाशांनी विकासकाची नियुक्ती केली आहे. पुनर्वसन प्रकल्प राबवला जाणार असल्याने विकासकाने वीज भरू असे सांगितले होते. मात्र, विकासकाने वीज बिलाची रक्कम भरली नसल्याने ही थकबाकी १०२ कोटीवर पोहचली आहे. थकबाकी वसूल करावी, यासाठी अदानी कंपनीकडून वेळोवेळी रहिवासी आणि विकासकाला सूचना देण्यात आल्या. मात्र, रहिवाशांनी आंदोलने आणि निर्दशने केल्याने थकबाकी वसूल करता आली नव्हती. सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाशांनी आणि ग्राहकांनी दिलेल्या चालू वीज देयके त्वरित भरण्याच्या आश्वासनावर आधारित वीज पुरवठा पूर्ववत केला होता. मात्र, त्यानंतरही थकबाकी भरलेली नाही. तसेच चालू महिन्याची बिलेही भरली जात नसल्याने सिद्धार्थ नगरमधील सुमारे ३५०० ग्राहकांची वीज बिले कापण्यात आली आहेत.