मुंबई -छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असलेल्या वादग्रस्त अदानीच्या बोर्डची शिवसैनिकांनी तोडफोड केली. या विमानतळाचे काम अदानी व्यवस्थापनाला मिळाल्यानंतर 'अदानी एअरपोर्ट' अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केली. याच तोडफोडीचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी समर्थन केले आहे. अशा प्रकारचे बोर्ड लावणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान असल्याचे सावंत यांनी सांगितले.
अदानीने केलेल्या कृत्याने महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान- अरविंद सावंत शिवसेनेकडून बोर्डची तोडफोड
मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे बोर्ड लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे बोर्ड लावण्यात आल्याने शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करत आज या बोर्डची तोडफोड करण्यात आली.
'अदानीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या टी-शर्ट्सवर अदानी विमानतळ लिहिले आहे. महाराजांचे नाव हातावर छोट्या अक्षरात लिहले आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. सांगूनही जेव्हा दुर्लक्ष केले जाते तेव्हा अशी प्रतिक्रिया दिली जाते. तो काय अदानी विमानतळ आहे का? याआधी असणाऱ्या जीव्हीकेने असे बोर्ड लावले होते का?,' असा सवालही अरविंद सावंत यांनी केला आहे.
याआधीही निर्माण झाला होता वाद
गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. अदानी समूहाने आता जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली आहे. मात्र जेव्हापासून अदानीने काम सुरू केले आहे. तेव्हापासूनच वाद सुरू झाले आहेत. RPG समूहाचे मालक हर्ष गोएंका यांनी या विमानतळाबाबत केलेल्या एका व्हिडिओ ट्विटमूळे वादंग निर्माण झाला होता. मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याबद्दल साजरा केला आनंद’ अशी कॅप्शन दिली होती. तेव्हा देखील मोठा वाद निर्माण झाला होता.
हेही वाचा -Maharashtra Unlock : दुकानाच्या वेळा रात्री 8 वाजेपर्यंत वाढवणार.. मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा, आज आदेश काढणार