मुंबई - बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हिची एनसीबीकडून जवळपास अडीच तास चौकशी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वत: एका महिला अधिकाऱ्यासोबत अनन्याची गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवस चौकशी केली होती. पण, अनन्याच्या चौकशीत पुरेशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे, तिला आज पुन्हा सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, आज अनन्या चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आली नाही.
हेही वाचा -विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांकडून ७७ कोटींचा दंड वसूल
नेमकं प्रकरण काय?
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरू असल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणाहून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले होते. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हॉट्सअॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचेदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांतील व्हॉट्सअॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे, आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली.