मुंबई- सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने आज मातोश्रीवर जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती.
सोनू सूद पालकमंत्री मंत्री अस्लम शेख यांच्यासोबत मातोश्रीवर दाखल झाला. त्यानंतर त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कामगारांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परतल्यानंतर सोनू सूदने शेवटचा कामगार घरी पोहोचवणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही त्याने माध्यम प्रतिनिधींना सांगितले. काश्मीर ते कन्याकुमारी असा सगळीकडे आपल्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपल्या कामात मदत करणाऱ्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.
सोनू सूदवरुन भाजप शिवसेनेत रंगला 'सामना'
संचारबंदीच्या काळात अभिनेता सोनू सूदने हजारो परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली. त्यामुळे सोनू सूदला परप्रांतीय कामगार देवदूत मानायला लागले. मात्र त्यावरुन राजकारण्यांचा चांगलाच 'सामना' रंगला. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून सोनूवर चांगलीच आगपाखड केली. सोनू सूदला पुढे करुन काही जण ठाकरे सरकराला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जणांनी सोनू सूदला दत्तक घेतल्याचा घणाघात राऊत यांनी नाव न घेता भाजपवर केला. परप्रांतीयांना घरी सोडण्यासाठी सोनूकडे पैसे येतात कुठून असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे चांगलाच सामना रंगला.