मुंबई - गायक सिद्धू मुसेवाला याची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता सिद्धू मुसेवालाप्रमाणे बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे एकच खळबळ उडली आहे. सलमान खानचे सलीम खान वडील सकाळी फिरण्यासाठी गेले होते. जेथे ते बाकड्यावर बसले होते, तिथे त्यांना एक पत्र सापडले आहे. त्यामध्ये 'सिद्धू मुसेवालाप्रमाणे तुमची हत्या करण्यात येईल,' असे लिहले आहे. याप्रकरणी आता वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( Salman Khan Letter Threatening To Kill ) आहे.
सलमान खानचे वडील सलीम खान रविवारी ( 5 मे ) वांद्रे बँडस्टँडच्या विहाराजवळ सकाळच्या वेळी फिरायला गेले होते. तेव्हा त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला सलमान खान फिरायला जातो आणि जिथे विश्रांती घेतो, तेथील बाकडावर हे पत्र आढळून आले आहे. तिथे एका बाकड्यावर हे पत्र ठेवण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय आहे पत्रात - या पत्रात सलमान खान आणि सलीम खान या दोघांनाही गंभीर धमक्या देण्यात आल्या होत्या. 'मूसा वाला जैसा कर दूंगा,' अशा आशयाचे हे पत्र होते. पोलीस बँडस्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या पत्रामागे कोण आहे? यासाठी पोलीस स्थानिक नागरिकांची चौकशी करत आहेत.