मुंबई -बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला अमली पदार्थ तस्करीप्रकरणी एनसीबीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले होते. यानुसार अर्जुन रामपालला आज १६ डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र वैयक्तिक अडचणीमुळे तो चौकशीसाठी हजर होऊ शकलेला नाही. यासंदर्भात एनसीबी अधिकाऱ्यांकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रामपाल याने एनसीबी चौकशीसाठी हजर होण्यासाठी २१ डिसेंबरची वेळ मागून घेतलेली आहे. मात्र अर्जुन रामपालचा ठावठिकाणा कुठे आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान अर्जुन रामपालकडून आलेल्या विनंतीबाबत एनसीबीने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बॉलिवूडमध्ये असलेले ड्रग्स सिंडिकेट प्रकरण एनसीबीकडून तपासले जात असताना बऱ्याच जणांना या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे.
''माझ्या घरात जे औषध मिळाले आहे, त्याचे प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे आहे''
याआधी ११ नोव्हेंबरला अर्जून रामपाल चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. त्यावेळी अमली पदार्थप्रकरणी अर्जुनची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. ''माझे अमली पदार्थांच्या संदर्भात काहीही घेणे देणे नाही. माझ्याघरात जे औषध मिळाले आहे, त्याचे प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे आहे, तसेच ते एनसीबीला दिले आहे'', अशी प्रतिक्रिया अर्जुनने माध्यमांशी बोलताना दिली होती.