महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण रोखा, पर्यावरण मंत्र्यांचे आवाहन

पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वन मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. जिल्ह्यातील अतिप्रदुषीत क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. प्रामुख्याने प्रदूषण निर्माण होणाऱ्या कोळसा खाणी, औष्णिक वीज केंद्रे, धूळ आदींमधून निर्माण होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठीचे मुद्दे अग्रस्थानी होते.

pollution in chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण रोखा, पर्यावरण मंत्र्यांचे आवाहन

By

Published : Sep 11, 2020, 8:27 AM IST

चंद्रपूर -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वन मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. जिल्ह्यातील अतिप्रदुषीत क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. प्रामुख्याने प्रदूषण निर्माण होणाऱ्या कोळसा खाणी, औष्णिक वीज केंद्रे, धूळ आदींमधून निर्माण होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठीचे मुद्दे अग्रस्थानी होते. राज्यातील औष्णिक वीज केंद्रातील प्रदूषण नियंत्रणाबाबत उर्जा मंत्री आणि उर्जा विभागाबरोबर नुकतीच बैठक घेऊन चर्चा करण्यात आली असून त्याच प्रार्श्वभूमीवर एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांबरोबरही समन्वय करुन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणाचे नियोजन करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वन मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली.
बैठकीस वन मंत्री संजय राठोड, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर आदी उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चंद्रपुरातील अधिकारी सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक कमी करण्यासाठी उपाययोजना करणे व प्रदूषण नियंत्रण आराखडा तयार करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आणि औष्णिक वीज निर्मिती केंद्रे आहेत. संवेदनशील वन क्षेत्रात येणाऱ्या कोळसा खाणींचे लिलाव न करता तेथील वनसंपदा आणि पर्यावरण जपावे यासाठी पर्यावरण विभागामार्फत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यातील काही कोळसा खाणींचे लिलाव रद्द करण्यात आम्हाला यश आले आहे, असे ते म्हणाले. याचबरोबर राज्यातील सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून होणाऱ्या प्रदुषणाला नियंत्रीत करण्याबाबतही नुकतीच उर्जा विभागासोबत बैठक घेतल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वीज केंद्रांचाही समावेश आहे. याच धर्तीवर एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याबरोबर समन्वय करुन उद्योगांमधून होणारे प्रदूषण, सांडपाणी व्यवस्थापन तसेच रस्ते आणि इतर बाबीतून निर्माण होणाऱ्या धुळीसारख्या प्रदूषण नियंत्रणासाठीही कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यात प्रदूषण निर्माण करणाऱ्या बाबी, हरित लवादाचे विविध निर्णय आदींबाबत पर्यावरण विभागाने स्थानिक कार्यालयाकडून माहिती घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणाबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यावरण मंत्र्यांनी दिल्या आहेत.
कर्करोगांसारख्या आजारात वाढ - पालकमंत्री
प्रदूषणामुळे चंद्रपूरमध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या आहेत. कर्करोगासारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. देशातील मोठ्या प्रदूषीत भागामध्ये या क्षेत्राचा समावेश होतो. विविध माध्यमातून होणाऱ्या येथील प्रदुषणावर जलद गतीने नियंत्रण आणणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात याव्या. शहरांमध्ये असलेल्या कोल डेपोंचे बाहेर स्थलांतर करण्यात यावे. राष्ट्रीय हरित लवादाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन व्हावे, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
यावेळी ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामधील गावांच्या अडीअडचणी व त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगानेही बैठक घेण्यात आली. या भागातील प्रतिबंधीत कृती वगळता इतर क्षेत्रात विकास कामे करणे, रोजगार निर्मितीसाठी पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देणे याअनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली. वन संवर्धन आणि शाश्वत विकास या दोन्हींचा समन्वय साधून नियोजन करण्यात येणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details