मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. अशावेळी मास्क हीच खऱ्या अर्थाने कोरोनापासून बचाव करण्यासाठीची लस आहे. परंतु औषध विक्रेते निश्चित दरापेक्षा अधिक किंमतीने मास्क विकत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) ने राज्यातील औषध दुकानाच्या तपासणीचे आदेश प्रत्येक विभागाला दिले आहेत. निश्चित दरापेक्षा अधिक दराने मास्क विक्री करत असल्याचे आढळून आल्यास, संबंधित औषध विक्रेत्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान प्रत्येक औषध दुकानात दर्शनी भागात मास्कचे दरपत्रक लावणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. असे दरपत्रक आढळून न आल्यास, त्या औषध विक्रेत्याविरोधात देखील कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व विभागाना देण्यात आल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त डी. आर. गहाणे यांनी दिली आहे.
मास्कच्या किंमती निश्चित करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क हेच मुख्य हत्यार आहे, हे अभ्यासातून समोर आले. त्यामुळे मास्क बंधनकारक झाला. मास्कची मागणी वाढली. कापडी मास्क बाजारात मोठ्या संख्येने उपलब्ध होत आहेत, पण सर्जिकल टू प्लाय, थ्री प्लाय मास्क, एन 95 मास्कच अधिक उपयोगी आहे. त्यामुळे हे मास्क मोठ्या संख्येने वापरले जातात. तर हे मास्क युज अँड थ्रो अर्थात वापरा आणि फेका असे असल्याने ते नियमित विकत घ्यावे लागतात. त्यामुळे या मास्कला मोठी मागणी असताना मास्क महाग पडत असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑक्टोबर 2020 मध्ये मास्कच्या किंमती कमी केल्या. मास्कच्या किमती निश्चित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले.
औषध विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन
ऑक्टोबर 2020 मध्ये सरकारने मास्कच्या किमती निश्चित करत दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले. 200 ते 350 रुपयांत मिळणारे एन 95 मास्क 19 ते 49 रुपयांत उपलब्ध करून दिले. तर 10 ते 15 रुपयांत मिळणारे टू प्लाय, थ्री प्लाय मास्क 3 आणि 4 रुपयांत उपलब्ध करून दिले. याच किमतीत मास्कची विक्री करणे विक्रेत्यांना बंधनकारक करण्यात आले. तर या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाईची तरतूद ही करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे औषध विक्रेत्यांनी मास्कचे दरपत्रक दुकानात दर्शनी भागात लावणे ही बंधनकारक केले. मात्र या दोन्ही नियमांचे उल्लंघन मुंबईसह राज्यभर होताना दिसत आहे. आता दुसरी लाट आली असून, मास्कची मागणी आणखी वाढली आहे. अशावेळी विक्रेते अधिक किमतीत मास्कची विक्री करून ग्राहकांची आर्थिक लूट करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज गहाणे यांनी राज्यभरात विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत, औषधांची दुकाने तपासण्याचे आदेश दिले आहेत. दरपत्रक नसल्यास अथवा जादा किमतीने मास्कची विक्रि होत असल्यास संबंधित औषध दुकानांवर करावाईचा इशारा देणात आला आहे.