मुंबई -मुंबईतगेल्या अकरा महिन्यांच्या उपाययोजनांनंतर कोरोना आटोक्यात आला. मात्र, रेल्वेतील प्रवासी आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिक मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मुंबईत कोरोना पुन्हा डोके वर काढण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी रेल्वे प्रवासात मास्क न वापरणाऱ्याविरोधात पालिकेने कठोर पावले उचलण्याचे ठरविले आहे. लोकलमध्ये प्रवास करताना मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनासंदर्भात आढावा बैठक -
मुंबईत लॉकडाउनमध्ये शिथीलता दिल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दी वाढू लागली. लोकल ट्रेनचा प्रवास खुला झाल्यानंतर गर्दीत आणखी वाढ झाली. त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, टास्क फोर्सचे सदस्य आदींशी संवाद साधला. यावेळी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपायांचा आढावा घेण्यात आला.