मुंबई -उन्हाळात उकाळ्यापासून बचावासाठी आता पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ( Central Railway Mumbai ) फुकट्या प्रवाशांनी आपला मोर्चा एसी लोकलकडे ( Mumbai AC Local ) वळविला असल्याची माहिती समोर आली आहे. मागील चार महिन्यात 5 हजार पेक्षा जास्त फुकट्या प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केलाचे निदर्शनात आले आहे. रेल्वेने त्यांच्याकडून विनातिकीट प्रवास केल्याबद्दल कारवाई करत सरासरी 24 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.
अशी केली कारवाई - मुंबईत दमट हवामान त्यातच उन्हाळा आला की, लोकलचा प्रवास नकोस वाटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी मुंबईतील एसी लोकलकडे धाव घेतात. याच कालावधीत एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या सुद्धा वाढली आहे. मात्र त्याच बरोबर उन्हाळ्याच्या उकाड्यापासून बचावासाठी रेल्वेतील फुकटे प्रवासी सुद्धा या एसी लोकलमध्ये शिरकाव करत असल्याची माहिती समोर आली आहे. यांची संख्या सुद्धा उन्हाळ्यात सगळ्यात जास्त असल्याचे निदर्शनात येत आहे. मध्य रेल्वेवर जानेवारी महिन्यात 995, फेब्रुवारी 814, मार्च 1179 आणि एप्रिल 1821 असे एकूण आतापर्यंत या चार महिन्यात 4 हजार 809 फुकट्यांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे. त्यांच्याकडून एकूण 18 लाख 66 हजार 540 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या वातानूकुली लोकलमधून एप्रिल महिन्यात 1 हजार 754 फुकट्यानी प्रवास केला आहे. त्यांच्याकडून 6 लाख 30 हजार 769 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.