मुंबई -सामान्य नागरिकांना वाहतुकीचे धडे देणारे पोलीस प्रशासनातील कर्मचारी मात्र हे नियम कशा प्रकारे तोडतात. कोणी त्यांना प्रतिउत्तर केले तर कशा प्रकारे त्याला धमकावतात, याची प्रचिती मुंबईत आली आहे. मुंबईच्या रस्त्यावरचा सामान्य नागरिक विरुद्ध पोलीस असा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सामान्य नागरिकांनी नियम तोडले तर त्याला पोलिसांकडून दंड आकारला जातो. मात्र दंड आकारणारा पोलीसच जर नियम तोडत असतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडे जायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक बाईकर मुंबई पोलीस उपनिरीक्षकाला विचारतो तुमचे 'हेल्मट कुठे आहे, सिग्नल का तोडलात?', असे विचारल्यास 'तू कोण आहेस?, तुला जाब विचारण्याचा अधिकार नाही, निघ इथून, मी सिग्नल मोडेन, लोकांना उडवेन, तू कोण मला विचारणारा?', असा उलट त्या बाईकवाल्यालाच सूनवणारा व्हिडिओ सध्या सोशलमिडीयावर चांगलाच गाजत आहे. गणवेष घालून वाहतुकीचे नियम मोडणे या पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आले आहे. ही घटना मुंबई गोरेगाव परिसरातील आहे. एका पोलिसानेच वाहतुकीचे नियम मोडले आणि त्याबद्दल एका सर्वसामान्य बाईकस्वाराने विचारणा केली असता, त्या पोलिसाने उर्मटपणे अरेरावी करण्यास सुरूवात केली.