मुंबई - मुंबईत रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांवर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईला विरोध होत असला तरी पालिकेने कारवाई सुरूच ठेवत गेल्या ३ दिवसात २४३ वाहनांवर कारवाई करत साडे आठ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील २७ वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात आढळून येणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर रविवार ७ जुलैपासून धडक कारवाई करण्यात येत आहे. अनधिकृत पार्किंग विरोधातील पहिल्या टप्प्यातील कारवाई दरम्यान गेल्या ३ दिवसात २४३ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन ८ लाख ६९ हजार ८०० रुपये एवढी दंड वसुली करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान उचलण्यात आलेल्या २४३ वाहनांमध्ये १३३ चारचाकी, ९ तीनचाकी व १०१ दोन चाकी वाहनांचा समावेश आहे. या कारवाईपोटी आजपर्यंत एकूण ८ लाख ६९ हजार ८०० रुपये एवढी रक्कम दंड म्हणून वसुल करण्यात आली आहे. या रकमेत कारवाई दरम्यान उचलण्यात आलेल्या वाहनासाठी लावण्यात आलेला दंड व विलंब आकाराचा समावेश आहे. ही रक्कम विभागातील विकास कामांसाठी खर्च केली जाणार आहे.