मुंबई -शिवसेना ( Shivsena ) हा नेहमी संघर्षशील पक्ष राहिलेला आहे. शिवसेना हा रस्त्यावर संघर्ष करणारा पक्ष म्हणून सुरुवातीपासूनच ओळखला जातो. मुंबईमध्ये बंद करायचा असेल तर तो शिवसेनेच पुकारावा आणि यशस्वी करून दाखवावा, अशी आजपर्यंतची या पक्षाची ख्याती आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरून संघर्ष करायला कधीही मागेपुढे पाहत नाही. मुंबईत झालेली अनेक आंदोलने असतील राज्यातील आंदोलने असतील किंवा हनुमान चालीसा प्रकरणामध्ये नुकतेच शिवसेनेने रवी राणा यांच्या विरोधात पुकारलेले आंदोलन असेल, शिवसेनेने सातत्याने आपला रस्त्यावरील पवित्रा किती आक्रमक आहे दाखवला आहे. मात्र, नव्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना अजूनही आक्रमकरित्या रस्त्यावर का उतरली नाही याची उत्तरे त्यांच्या विधिमंडळाच्या आणि न्यायालयाच्या संघर्षातही दडली आहेत.
विविध लढाया एकाच वेळेस -शेंडी-जानव्याचे हिंदुत्व हे खरं हिंदुत्व नाही ही भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आता आपलं हिंदुत्व हे कसं निखळ हिंदुत्व आहे हे नव्याने सिद्ध करावे लागणार आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईल या महत्त्वाकांक्षेला सुद्धा त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. ही टक्कर वैचारिक आणि भावनिक या दोन्ही पातळ्यांवर द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना आता फुटू पाहते आहे, ती फुटणार नाही, यासाठी त्यांना वैचारिक आणि भावनिक पातळीवर संघर्ष करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया जेष्ठ राजकीय विश्लेषक रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केली आहे. हे सर्व संघर्ष करताना त्यांना सरकार टिकवण्यासाठी संसदीय आणि न्यायालयीन लढाई सुद्धा तितक्याच ताकदीने लढावी लागते आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि त्यांचे सहकारी आता जागोजागी मेळावे घेऊन सुरू करत आहेत, हे यावरून स्पष्ट दिसते आहे. असेही आंबेकर म्हणाले.