मुंबई- पश्चिम रेल्वेवर वातानुकुलित लोकल धावल्यानंतर मध्य रेल्वेवर ही सेवा कधी सुरू होणार याची प्रतिक्षा सर्वांना होती. ही प्रतिक्षा आता संपली असून, आजपासून सीएसएमटी ते कल्याण दरम्यान वातानुकुलित लोकलच्या १० फेर्या सुरू झाल्या आहेत. आज पहाटे ५ वाजून ४२ मिनिटांनी कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान पहिली वातानुकुलित लोकल चालविण्यात आली. तर, रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी शेवटची सीएसएमटी-कुर्ला वातानुकुलित लोकल धावणार आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वे प्रवाशांनाही थंडगार प्रवास अनुभवता येणार आहे.
मुंबईत मध्य रेल्वेचीही आजपासून वातानुकुलीत सेवा! पहाटे धावली पहिली एसी लोकल.. असे असणार वेळापत्रक..
तिकीट भाडे इतके असेल..
एसी लोकलचे तिकिट सामान्य लोकलच्या फस्ट क्लासच्या तुलनेत १.३ पटीने जास्त आहे. एसी लोकलचे कमीत कमी तिकिट ६५ तर जास्तीत जास्त तिकिट २२० आहे. त्यामुळे एसी लोकलचा प्रवास सामान्य मुंबईकरांच्या परवडणारा नाही. त्यातच एसी लोकलकरता सामान्य लोकलच्या दहा फेर्या रद्द केल्यामुळे इतर गाड्यांना गर्दी होणार आहे.
मध्य रेल्वेने ३० जानेवारी २०२० पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली वातानुकुलित लोकल सुरू केली होती. तर मुख्य मार्ग हार्बर रेल्वे मार्गावर वातानुकुलित लोकल प्रतीक्षेत होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर ही वातानुकुलित लोकल चालविण्यासाठी रेल्वे महामंडळाकडून बुधवारी परवानगी देण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वेने या मार्गावर वातानुकुलित लोकल प्रायोगिक तत्वावर चालविण्यात येणार आहे. सोमवार ते शनिवार सहा दिवस वातानुकुलित लोकल धावणार आहे. वातानुकुलित लोकल सुरू करण्याकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने वेळापत्रकात बदल करत सामान्य लोकलच्या दहा फेर्या रद्द केल्या आहेत.