मुंबई - समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) यांनी आज मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या विविध विषयांवर चर्चा केली. प्रामुख्याने राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा निषेध करत, राज ठाकरे यांना बेड्या ठोकण्याची मागणी त्यांनी शरद पवारांकडे केली आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
Abu Azmi Meet Sharad Pawar : राज ठाकरेंना बेड्या ठोका; अबू आझमींची शरद पवारांकडे मागणी - अबू आझमी राज ठाकरे भाषण निषेध
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray Speech) यांनी केलेल्या मशिदीवरील भोंग्यांच्या (Masjid Loudspeakers) वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच राज ठाकरे यांना बेड्या ठोकण्याची मागणी अबू आझमी यांनी शरद पवारांकडे केली आहे.
![Abu Azmi Meet Sharad Pawar : राज ठाकरेंना बेड्या ठोका; अबू आझमींची शरद पवारांकडे मागणी Abu Azmi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14963855-797-14963855-1649412487871.jpg)
राज ठाकरे यांना बेड्या ठोका -राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबतचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावरून धर्मांमध्ये राजकारण तापलं आहे व त्याचे पडसाद आता सर्व ठिकाणी उमटत आहेत, त्याविषयी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्याच पद्धतीने हे भोंगे कायद्याप्रमाणे लावण्यात आलेले आहेत. राज ठाकरे हे यामध्ये विनाकारण राजकारण करत आहेत. राज ठाकरे यांचे सध्या स्वतःचे असे काही अस्तित्वच राहिलेले नाही. त्यामुळे ते नैराश्याच्या भावनेतून हे सर्व बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अबू आझमी यांनी शरद पवार यांना सांगितले. या कारणास्तव राज ठाकरे यांना बेड्या ठोकून तुरुंगात टाका, अशी मागणीही आझमी यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
शरद पवार मला मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे -समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी शरद पवार यांची मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. त्यावेळी मुंबईतील सानपाडा येथे एका मशिदीचा विषय अनेक वर्षांपासून मार्गी लागत नाही. याकडे पवारांचे लक्ष वेधले. याविषयी बोलताना आझमी म्हणाले की, मशिद बांधण्यासाठी परवानगी भेटूनही स्थानिक लोक विशेष करून शिवसेना व आरएसएस वादी विचारांचे लोक त्रास देत आहेत. कोर्टानेसुद्धा मशीद बांधण्यासाठी परवानगी दिली आहे व या जागेला संरक्षण देण्यात यावे असेही सांगितले आहे. शरद पवार यांनी यामध्ये लक्ष घालावे अशी इच्छा अबू आझमी यांनी पवार यांच्याकडे व्यक्त केली. तसेच सध्याच्या घडीला देशातील सर्वोत्तम नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवार हे मला मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे असून, म्हणून मी त्यांच्याकडे आज ही विनंती केली आहे, असेही अबू आझमी म्हणाले.