मुंबई - मुंबईमध्ये चार महिने पाऊस पडतो. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या नसल्याने हे पाणी थेट समुद्रात जाते. पाणी जमिनीत मुरावे यासाठी पालिकेची रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना फसली आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने पुढाकार घेत ३०० उद्यानामध्ये १५०० शोषखड्डे तयार केले आहेत. अशा शोष खड्ड्यांमधून गेल्या यावर्षी ४ लाख लीटर पाणी मातीत झिरपल्याचा दावा उद्यान विभाकडून करण्यात आला आहे.
पाणी झिरपण्यासाठी शोष खड्डे -मुंबईमध्ये गेले कित्तेक वर्षे विकास कामे सुरु असल्याने काँक्रीटचे जंगल निर्माण झाले आहे. काँक्रीटच्या जंगलामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही, ते थेट नाल्याद्वारे समुद्राला जाऊन मिळते. यामुळे जमिनी खालील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. पावसाचे पाणी जमिनीत झिरपावे यासाठी मातीची आवश्यकता असते. मुंबईत उद्यान आणि क्रीडांगणामध्ये माती असल्याने उद्यान विभागाने शोष खड्डे तयार करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षांपासून आतापर्यंत ३०० उद्यानांमध्ये १५०० शोष खड्डे तयार करण्यात आले आहेत. अशा शोष खड्ड्यांमधून गेल्या यावर्षी ४ लाख लीटर पाणी मातीत झिरपल्याचा दावा उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी केला आहे. येत्या काळात सर्व ७०० उद्यानांमध्ये मिळून ४५०० शोषखड्डे तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.