मुंबई -पश्चिम आणि पूर्व उपनगराला एकमेकांशी जोडत वाहतूक कोंडी फोडत हे अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने गोरेगाव-मुंबई लिंक रोड प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीपझ) प्रमाणे आता हा प्रकल्पही वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण हा लिंक रोड आरेतून जाणार असून यासाठी आरेतील जागा संपादित करण्यात येणार आहे. तेव्हा आरेतून हा रस्ता नेण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. यामुळे आरे जंगलाला धक्का पोहोचणार असल्याचे म्हणत यातून काही मार्ग काढत आरेला धक्का न पोहचवत प्रकल्प मार्गी लावता येईल का, याचा विचार करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड नकाशा गोरेगाव ते मुलुंड प्रवास केवळ 15 मिनिटांत -आज गोरेगाववरून मुलुंडला जायचे असल्यास वाहनचालक-प्रवाशांना किमान दीड-दोन तास लागतात. प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तर ज्या पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती मार्गावरून जावे लागते या दोन्ही मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी असते. तेव्हा या सर्व अडचणी लक्षात घेत पालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार 13.65 किमीचा जोडरस्ता बांधण्यात येणार असून हा सहा मार्गिकेचा असणार आहे. तर यासाठी अंदाजे 4800 रुपये खर्च अपेक्षित आहे. तर यात दोन टनेल (भुयार) बांधण्यात येणार आहे. दरम्यान या टनेलसाठी च्या खर्चात वाढ झाल्याने हा खर्च 6000 कोटीच्या पुढे जाणार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच पालिकेकडून सुरू होण्याची शक्यता आहे. तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. कारण या रस्त्यामुळे गोरेगाव-मुलुंड अंतर दीड-दोन तासांऐवजी केवळ 15 मिनिटांत पार करता येणार आहे. दरम्यान पश्चिम द्रुतगती मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गावरील अमर नगर असा हा लिंक रोड असणार आहे.
आरेतील 4. 85 हेक्टर जागा जाणार -सहा मार्गिकेचा हा जोड रस्ता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरेतून जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानातून हा रस्ता भुयारी मार्गे जाणार आहे. मात्र त्याचवेळी आरेतून मात्र हा जमिनीवरून जाणार आहे. सद्या जो आरेतून, फिल्म सिटीतून जो गोरेगाव-पवई रस्ता जातो त्या रस्त्याला जोडून हा नवीन रस्ता जाणार आहे. यासाठी आरेतील 4.85हेक्टर जागा घेण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी दिली आहे. तर हा रस्ता आरेतून नेण्यास त्यांनी विरोध दर्शविला आहे. सेव्ह आरे ही आमची चळवळ आहे. पण अनेकांना वाटतं की आमचा विरोध फक्त मेट्रोला आहे. तर हे तसं नाही. आरे जंगल असून त्याचे संवर्धन झाले पाहिजे आणि मग आरेला धक्का पोहचवणाऱ्या सर्व प्रकल्पाला आमचा विरोध असेल. त्यानुसार आता हा प्रकल्प आरेला धक्का पोहवत आहे. त्यामुळे आता आम्ही यालाही विरोध करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
..अन्यथा न्यायालयात जाऊआरेतून हा रस्ता नेण्यास बाथेना यांनी विरोध केला आहे. हा रस्ता इतर कुठून नेता येईल का? कमीत कमी जागा वापरत प्रकल्प राबवता येईल का ? याचा विचार पालिकेने करावा अशी मागणी बाथेना यांनी केली आहे. तर आम्ही ही काही पर्याय शोधण्यासाठी अभ्यास करत आहोत. मात्र काहीही झाले तरी आरेला धक्का पोहचता कामा नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करत जर हा प्रकल्प रेटला गेला तर नक्कीच विरोध तीव्र होईल. त्याचवेळी शेवटचा मार्ग म्हणून आम्ही न्यायालयात ही जाऊ असा इशारा ही त्यांनी दिला आहे.