मुंबई -मेट्रो कारशेडसाठी गोरेगाव आरे येथील ५ हेक्टर जागेवरील झाडे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेताच तोडली. त्यामुळे मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेस आणि शिवसेनेने केली आहे.
घटनेबाबत माहिती देताना मुंबई महापालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. मेट्रोच्या कामासाठी गोरेगाव आरे येथील २ हजार २०० झाडे तोडली जाणार आहेत. झाडे तोडण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी घ्यावी लागते. मेट्रोसाठी झाडे तोडण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव गेले २ वर्ष वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी रखडला आहे. मात्र, आरेमध्ये ज्या ठिकाणी झाडे तोडली जाणार आहेत, त्याठिकाणी वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान आरेमधील २७ हेक्टर जागेपैकी ५ हेक्टर जागेवरील झाडे तोडून त्याठिकाणी कारशेडचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. यामुळे आज (बुधवारी) झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले.
घटना उजेडात आल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेताच ५ एकर जागेवरील झाडे तोडलीच कशी? असा प्रश्न उपस्थित करत झाडे तोडणाऱ्या मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा (एफआयआर) नोंद करावा, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. त्यामुळे सामान्य नागरिकांनी झाडे तोडल्यास त्यांच्यावर गुन्हे नोंद करणारी महापालिका मेट्रो रेल कोर्पोरेशनवर गुन्हे दाखल करणार का? याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
आम्ही वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य गुन्हे नोंदणी करण्याची मागणी करू शकतो. वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष हे स्वतः आयुक्त आहेत. आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करायला हवेत, असे यशवंत जाधव यांनी सांगितले. आम्ही विकासाच्या विरोधात नाही मात्र, झाडे तोडण्यास आमचा विरोध आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी ५ हेक्टर जागेवरील झाडे तोडण्यात बिनापरवानगी तोडण्यात आल्याने मेट्रो रेल कोर्पोरेशनवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. तसे गुन्हे नोंद करण्यासाठी पालिका आयुक्तांना पात्र देणार असल्याचे रवी राजा यांनी सांगितले.
मेट्रोसाठी गोरेगांव आरे येथील २ हजार २०० झाडे तोडण्यात येणार आहेत. नागरिकांचा आणि पर्यावरण प्रेमी संघटनांचा झाडे तोडण्याला विरोध आहे. त्याबाबत २ केसेस न्यायालयात सुरू आहेत. येथील २७ आदिवासी पाड्यांचे पुढे काय होणार? झाडे तोडण्याच्या विरोधात तब्बल ८० हजार तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. त्या तक्रारींना पालिकेने काय उत्तर दिले आहे. याची सविस्तर लेखी माहिती पालिका प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण समितीला दिलेली नाही, ही माहिती समितीला द्यावी, अशी मागणी करत मेट्रोसाठी झाडे तोडण्याचा प्रस्ताव रोखण्यात आला.