मुंबई -मुंबई लोकलमधील वाढत्या गर्दीने एका 22 वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर ते गोरेगाव स्थानकादरम्यान धावणार्या लोकलमध्ये असलेल्या अतिरिक्त गर्दीमुळे 22 वर्षीय तरुण धावत्या लोकल रेल्वेतून खाली कोसळला. त्याला तत्काळ शताब्दी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने त्यास मृत घोषित केले. या मृत्यूमुळे लोकलमधील वाढती गर्दी ही गंभीर समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
उपचारादरम्यान मृत्यू -मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 21 मार्च) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास रतन विश्वकर्मा नावाचा 22 वर्षीय तरूण अंधेरीहून नालासोपारा येथे लोकलने जात होता. यावेळी लोकलमध्ये गर्दी असल्याने तो दरवाज्यात लटकत होता. रात्री 9.50 वाजण्याच्या सुमारास राम मंदिर-गोरेगाव दरम्यान लोकल दरवाजातून हात निसटल्याने धावत्या लोकलमधून तो खाली पडला. या घटनेची माहिती सुरक्षा विभागाला मिळाल्यानंतर घटनास्थळी रेल्वे पोलीस दाखल झाले. तरुणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रतन विश्वकर्मा पेशाने सुतारकाम करत होता.
अशी घडली घटना -रतन अंधेरी येथे कामानिमित्त आला होता. त्याने नालासोपारा येथे जाण्यासाठी लोकल पकडली. लोकलमधून लटकत प्रवास करत असताना हात निसटून लोकलमधून पडल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. खांब लागून अपघात झाला नाही. कारण घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी पाहणी केली असता, खांब्याला रक्त्याचे डाग दिसून आले नाही. तसेच रेल्वे रूळाजवळ पाहणी केली. या घटनेची अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्हीद्वारे अधिक तपासणी केली जात आहे, अशी माहिती बोरीवली रेल्वे पोलिसांनी दिली.
लोकल प्रवाशांची संख्या 60 लाखांवर -वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मार्च ते जून, 2020 या चार महिन्यांच्या काळात उपनगरीय लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर, फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. हळूहळू प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू झाली. साधारण 10 ते 15 लाख प्रवाशांचा प्रवास होत होता. मात्र, दोन वर्षांनंतर कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असताना लोकलमधील गर्दी वाढत आहे. सध्या सुमारे 60 लाख प्रवाशांचा दररोज प्रवास होत आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरून दररोज सुमारे 35 लाख तर पश्चिम रेल्वेवरून सुमारे 25 लाखांच्यावर प्रवाशांचा प्रवास होत आहे. मागील महिन्यात मध्य रेल्वेवरून सुमारे 30.84 लाख प्रवासी होते.
हेही वाचा -Shivsena Important Meet : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांची बैठक