मुंबई- उच्च न्यायालयातील वकिलांसाठी खास लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात 1 हजार लसी उपलब्ध करून देण्याची मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून कबूली देण्यात आली आहे. पुढील आठवड्यातला एक दिवस या विशेष लसीकरणासाठी राखीव ठेवण्यास मुख्य न्यायमूर्तींनी सुध्दा परवानगी दिली आहे.
कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी राबवण्यात आली एक विशेष लसीकरण मोहीम
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती शिंदे आणि बॉम्बे बार असोसिएशनसह इतर वकिल संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहलही ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. पुढील आठवड्यात हायकोर्टात ही विशेष मोहीम राबवण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचारी वर्गासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. ज्यात एकूण 2100 जणांना लस देण्यात आली. त्यानंतर आता हायकोर्टात वकिली करणाऱ्या वकिलांसाठी लसीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत वकिलांची संख्या काही हजारोमध्ये आहे, हे पाहता लसीकरण त्यावर एकच उपाय दिसत आहे.