मुंबई -मुंबईतील शिवडीच्या 59 वर्षीय व्यक्तीने रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकल ट्रेनच्या मोटरमॅनने प्रसंगावधान दाखवत जागीच ब्रेक लावल्याने या प्रवाशाचे प्राण वाचले आहे. ही संपूर्ण घटना स्थानकांवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
हेही वाचा -MH Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचे सूप वाजले; अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये २८ फेब्रुवारीला
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद -
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवडी येथे राहणारे 59 वर्षीय मधुकर साबळे यांनी शिवडी स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लोकल ट्रेनचे मोटरमॅन जे.वाय. वैती यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ ब्रेक दाबला आणि लोकल जागीच उभी राहिली. साबळे यांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे दृश्य बघताच तैनात असलेल्या वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल धनश्री पंडित शेलार आणि महिला होम गार्ड ऋतुजा मांडे यांनी क्षणाचाही विचार न करता रेल्वे रुळावर धाव घेतली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला रेल्वे रुळाच्या बाजूला केले. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल -
ही घटना रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये टिपली गेली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जीआरपी महिला कॉन्स्टेबल धनश्री पंडित शेलार आणि महिला होम गार्ड ऋतुजा मांडे या दोघींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हेही वाचा -Fire in Kandivali : कांदिवली येथील आगीत २७ जणांना धुराची बाधा, १३ जण गंभीर