मुंबई -राज्यात काही दिवसापासून वातावरणात मोठे बदल झाले आहेत. विविध ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. तर काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाली. आता येत्या चार दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आली. दक्षिण अरबी समुद्रात १५ मे रोजीच्या आसपास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान खात्याकडून अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मच्छिमारांना किनाऱ्यावर परत येण्याचा इशारा -
अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना परत बोलवण्यात येत आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका असताना आता चक्रीवादळामुळे राज्यासमोर नवीन संकट उभे राहिले आहे.
किनारपट्टीवर राहणाऱ्यांना हाय अलर्ट -
दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होत आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर पश्चिमेला सरकण्याची शक्यता आहे. १४ मे पासून केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.