मुंबई -मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने 13 वर्षीय अल्पवयीन सावत्र नातीचे लैंगिक शोषण व पॉर्न व्हिडिओ मोबाईल वर दाखवल्या प्रकरणी तिच्या आजोबाला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने पीडितेची फसवणूक करून तिला उद्ध्वस्त केले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
हेही वाचा -उताराला लागलेल्या गाडीचा अपघात अटळ, संजय राऊत यांची फडणवीस यांच्यावर टीका
विशेष न्यायालयाने निकालात म्हटले की, अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित गुन्ह्याला पुरेशी शिक्षा देऊन हाताळले पाहिजे. बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार हा केवळ महिलांविरुद्धचा गुन्हा नाही तर समाजाविरुद्धही हा गंभीर गुन्हा आहे. आपली वासना पूर्ण करू पाहणाऱ्या हल्लेखोरांसाठी पीडिता सोप्या शिकार ठरतात. आरोपीने निकटवर्ती असलेल्या चिमुरडीला लुटले.
दुसरीकडे कौटुंबिक वादामुळे आपल्याविरुद्ध खटला पुन्हा सुरू झाल्याचा बचाव आरोपीच्या बाजूने करण्यात आला. सावत्र मुलीने मागितलेले 25 हजार रुपये आपण दिले नसल्याचे आरोपीने सांगतिले. मात्र, अनेक साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे पाहता न्यायालयाने वैद्यकीय अहवाल तपासला ज्यात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली. यावेळी न्यायाधीश शेंडे यांनी मुलीने लैंगिक अत्याचाराबाबत यापूर्वी का सांगितले नाही या मुद्द्यावर लक्ष वेधले. पीडितेची वैद्यकीय चाचणी हा सबळ पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. तिने आधी खुलासा न केल्यामुळे तिची साक्ष नाकारण्याचे कारणच नाही. अशा हल्ल्यांना बळी पडून वर्षानुवर्षे गप्प बसणे ही आपल्या समाजात नवीन गोष्ट नाही यावरही न्यायाधीशांनी जोर दिला.
36 पानी निकालपत्रात म्हटले आहे की, या प्रकरणातील पीडितेचे म्हणणे आहे की, जर तिने याबाबत कोणाला सांगितले असते तर तुझ्या आई-वडिलांना जीवे ठार मारून टाकेन, अशी धमकी आरोपीने तिला दिली होती. त्यामुळे तिच्यावर दबाव निर्माण झाला. त्यामुळे, तिने आरोपीचा निर्लज्ज आणि विकृत चेहरा उघड केला नाही. आपल्या समाजात हे नवीन नाही. अपमान कौटुंबिक सन्मान इत्यादी गोष्टींच्या भीतीने कुटुंबे तोंड बंद ठेवतात असे अनेक वेळा घडते. लहानपणी त्यांच्यासोबत झालेल्या अशा कृत्यांचे पडसाद मोठ्यांच्या पाठिंब्याअभावी त्यांना सहन करावे लागतात. मोठे झाल्यावर त्यांच्या भावना काय असतील? ते खरोखरच अशा मोठ्यांचा आदर करतील का? असा प्रश्नही न्यायाधीशांनी उपस्थित केला.
आरोपीच्या सावत्र मुलीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तर पीडित बालिका ही तिची सख्खी मुलगी आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर 2014 मध्ये ती काही कामानिमित्त बाहेर गेली होती. ती परत आली तेव्हा आपले सावत्र वडील तिच्या मुलीला चुकीच्या पद्धतीने पकडून ठेवत फोनवर काही व्हिडिओ दाखवत असल्याचे तिने पाहिले. महिलेची नजर पाहून सावत्र बाप बालिकेला सोडून निघून गेला. संशयाच्या कारणावरून महिलेने मुलीकडे विचारणा केली असता तिने सांगितले की तिचा सावत्र आजोबा तिचे लैंगिक शोषण करत असे आणि मोबाईलवर तिला अश्लील व्हिडिओ दाखवत असे.
हेही वाचा -समुद्रा मालवाहू बोटीला जलसमाधी;कोणतीही जीवितहानी नाही