मुंबई - सांताक्रूझ पोलीस ठाणे परिसरात फिजिओ थेरिपी उपचाराच्या नावाखाली एका 35 वर्षीय डाँक्टरने 16 वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी हरिष बाडिगर या डाँक्टरवर गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलगी ही दिव्यांग असून ती डाँ. हरिषकडे 2016 पासून उपचार घेण्यासाठी येत होती. ऑक्टोंबर 2019 ते मार्च 2021 रोजी उपचारादरम्यान पीडित मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपीने वेळोवेळी अत्याचार केले.
दरम्यान काही दिवसापूर्वी पीडित मुलीने या घटनेची माहिती मोबाइलवर मॅसेज करून आईला दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर घटना...
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कांदिवलीत एका सहा वर्षीय मुलीवर 19 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होते. तसेच पाहुणी म्हणून मावशीच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अत्याचारी काका विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सप्टेंबर महिन्यात संगमनेर येथे पित्याकडूनच पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.