नवी मुंबई -दिलेले पैसे मित्राने परत केले नाही व सतत पैसे मागण्याचा तगादा लावूनही मित्र टाळाटाळ करत होता. त्यामुळे मित्रानेच मित्राचा खून करून त्याच्या देहाचे तुकडे करून नवी मुंबई परिसरात टाकल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
पैशाच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून मृतदेहाचे तुकडे टाकले इतरस्त्र -
12 तारखेला नवी मुंबईतील एपीएमसी परिसरातील धान्य मार्केट जवळ एका निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या बॅगेत दोन मानवी हात व मांड्यांचे तुकडे आढळून आले होते. त्यामुळे या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. संबधित प्रकार कोणीतरी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून केला आहे. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला.
गोंदवलेल्या नावामुळे लक्षात आला प्रकार -
एपीएमसी परिसरात निळ्या बॅगेत सापडलेल्या मानवी तुकड्यातील हातावर रवींद्र असे नाव व हनुमानाचे चित्र गोंदवले होते. त्याअनुषंगाने अथक प्रयत्न करून एपीएमसी पोलिसांच्या पथकाने ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील मिसिंग तक्रारीची पडताळणी सुरू केली. त्यातच ज्योती मंडोटीया नावाच्या महिलेने तिचा पती रवींद्र मंडोटीया गेल्या काही दिवसांपासून हरविल्याची कोपर खैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच सापडलेले अवयव मृताच्या पत्नीला दाखवले असता गोंदण पाहून ओळख पटली.
गुन्ह्याचा तपास केला असता सर्व प्रकार उघडकीस आला -
याप्रकरणी चौकशीअंती सुमित कुमार हरिष कुमार चौहान (वय 27) याला ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली. मृत रवींद्र व सुमित कुमार हे एकमेकांचे मित्र तसेच दूरचे नातेवाईक होते. सुमित कुमारने मृत रवींद्र याला काही पैसे उसने दिले होते. मात्र वारंवार मागूनही रवींद्रने ते पैसे परत केले नव्हते. तसेच एका जुन्या भांडणाचा राग देखील सुमितचा रवींद्रवर होता. त्यामुळे सुमितकुमारने 9 सप्टेंबरला मृत रवींद्रला दारू पाजली व गळा चिरून खून केला. त्यानंतर त्याचे तुकडे करत तीन भाग करून हात व मांड्या एपीएमसी परिसरात धड म्हापे परिसरात टाकले व मुंडके एका मैदानात पुरल्याची कबुली आरोपीने दिली. याप्रकरणी सुमित कुमारला अटक करण्यात आली असून 22 सप्टेंबर पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.