नवी मुंबई -लग्न जमवण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याने तसेच मृत व्यक्तीच्या मनोरुग्ण भावाच्या नावे केलेल्या रूमच्या बुकिंगचे सहा लाख रुपये हडपण्याचा उद्देशाने पनवेल परिसरात असणाऱ्या वाजे गावाच्या हद्दीत एका तरुणाची हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मित्रासह तिघांना नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केले आहे.
२८ जुलैला आढळून आला होता तरुणांचा मृतदेह -२८ जुलैला वाजे परिसरात एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज नसल्याने पोलिसांनी तब्बल १५ ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याचा तपास लावला. संबंधित मृतदेह प्रवीण शेलार या व्यक्तीचा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तपास केला असता प्रवीण शेलारचा मित्र नरेश बेटकर व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले.
लग्न जमवण्यासाठी दिलेले चाळीस हजार रुपये परत देऊ नये म्हणून केली हत्या -वाजे परिसरात आढळलेला तरुणाचा मृतदेह हा प्रवीण शेलार 28 या व्यक्तीचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. प्रवीण हा अविवाहित होता व तो लग्नासाठी मुलगी पाहत होता. लग्न जमवण्यासाठी प्रवीणने नरेश बेटकर (30) ला 40 हजार रुपये दिले होते. मात्र, काही केल्या लग्न जमत नसल्याने प्रविणने ते पैसे परत मागण्यासाठी नरेशकडे तगादा लावला आहे.